

मुंबई : भटक्या कुत्र्यांना पकडल्यानंतर निर्बीजीकरण व लसीकरण करून पुन्हा त्याच परिसरात सोडण्याच्या पद्धत आता बंद होणार आहे. न्यायालयाच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर, मुंबई पालिकेने संवेदनशील परिसरातून पकडण्यात येणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी निवारा, आहार, उपचार, लसीकरण व आयुष्यभर देखभालीची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जेनिस स्मिथ ॲनिमल वेल्फेअर ट्रस्ट या ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया मान्यताप्राप्त संस्थेची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली असून श्वानांचा आहार व देखभालीसाठी प्रति श्वान प्रतिदिन १५५ रुपये खर्च करणार असून एकूण १३ कोटी ३५ लाख रुपये खर्च करणार आहे.
शाळा-महाविद्यालये, सार्वजनिक व खासगी रुग्णालये, क्रीडा संकुले, बसस्थानके व बस डेपो, आंतरराज्य बस टर्मिनल तसेच रेल्वे स्थानकांतील भटक्या श्वानांना तातडीने पकडण्यात येणार आहे. त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण केल्यानंतर त्यांना पुन्हा त्याच संवेदनशील परिसरात सोडले जाणार नाही. त्याऐवजी नियुक्त निवारा केंद्रात त्यांची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी वर्षाला सुमारे ५.५ कोटी खर्च अपेक्षित आहे. निवारा केंद्रात श्वानांची नोंदणी, खाद्य-पाणीपुरवठा, स्वच्छता, वैद्यकीय उपचार, लसीकरण आणि आवश्यक देखभालीची जबाबदारी संबंधित संस्थेवर सोपवण्यात आली आहे.
अनुभवी संस्थेची निवड
महापालिकेने या कामासाठी ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया मान्यताप्राप्त संस्थांकडून स्वारस्य अर्ज मागवले होते. त्यातून जेनिस स्मिथ ॲनिमल वेल्फेअर ट्रस्टची निवड करण्यात आली. या संस्थेकडे पाचगणी येथे श्वान निवारा केंद्र तसेच वसई, विरार, सफाळे आणि कल्याण-डोंबिवली येथे ॲनिमल बर्थ कंट्रोल केंद्र चालवण्याचा अनुभव असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जीपीएस आधारित नोंदीकरण, फोटो लॉगिंग
श्वानांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता राहावी, यासाठी जीपीएस आधारित नोंदीकरण, फोटो लॉगिंग आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर नियमित अहवाल सादर करणे संस्थेला बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे कोणता श्वान कुठून पकडला, त्याच्यावर कोणती प्रक्रिया करण्यात आली आणि त्याची पुढील देखभाल कुठे केली जात आहे, याची नोंद ठेवली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.