Mumbai : सागरी सुरक्षेला बळ; सागर रक्षक दलाच्या स्वयंसेवकांची संख्या पोहोचली ३ हजार १५६ वर

मुंबई किनारपट्टीच्या सुरक्षेला अधिक बळकट करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘सागर रक्षक दल’ या लोकसहभागावर आधारित स्वयंसेवक दलाचा विस्तार आणि सक्षमीकरण सुरू केले आहे.
Mumbai : सागरी सुरक्षेला बळ; सागर रक्षक दलाच्या स्वयंसेवकांची संख्या पोहोचली ३ हजार १५६ वर
Mumbai : सागरी सुरक्षेला बळ; सागर रक्षक दलाच्या स्वयंसेवकांची संख्या पोहोचली ३ हजार १५६ वर'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

पूनम अपराज /मुंबई

मुंबई किनारपट्टीच्या सुरक्षेला अधिक बळकट करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘सागर रक्षक दल’ या लोकसहभागावर आधारित स्वयंसेवक दलाचा विस्तार आणि सक्षमीकरण सुरू केले आहे. किनारपट्टी भागातील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचे ‘डोळे आणि कान’ म्हणून हे दल काम करते. जनतेच्या वाढत्या प्रतिसादामुळे सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यात पोलिसांना मदत करणाऱ्या स्वयंसेवकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊन ती ३ हजार १५६ वर पोहोचली आहे.

किनारपट्टी भागातील दक्षता राखण्यात सागर रक्षक दलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, हे ओळखून मुंबई पोलिसांनी आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सागरी पोलीस ठाण्यांना नवीन सदस्यांची नोंदणी करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी एक विशेष सदस्यत्व मोहीम राबवण्यात आली. परिणामी, मुंबईभरात सागरी सुरक्षेसाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सागर रक्षक दलाच्या सदस्यांची संख्या आता ३ हजार १५६ वर पोहोचली आहे. किनारपट्टी आणि समुद्रातील हालचालींबाबत गुप्त माहिती गोळा करण्यासाठी पोलीस अधिकारी या स्वयंसेवकांसोबत नियमित बैठका घेत आहेत. मच्छिमार, किनारपट्टीवरील रहिवासी आणि प्रवासी बोटचालक यांची साथ तितकीच महत्त्वाची आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करणे शक्य

कोणतीही संशयास्पद हालचाल, वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास स्वयंसेवकांनी तातडीने ११२ या आपत्कालीन हेल्पलाइनवर कॉल करावा किंवा थेट स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. यामुळे तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करणे शक्य होईल आणि मुंबईच्या सागरी सुरक्षेची यंत्रणा अधिक भक्कम होणार आहे.

विशेष सदस्यत्व मोहिमेद्वारे हे दल अधिक मजबूत केले जात आहे. या मोहिमेचा भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर नवीन स्वयंसेवक या उपक्रमात सामील झाले आहेत. पोलीस या सदस्यांशी नियमित संवाद साधत असून त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

विजयकांत सागर, पोलीस उपायुक्त, बंदर परिमंडळ

logo
marathi.freepressjournal.in