Mumbai : विद्यार्थ्यांनी घडवल्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईतील ५० हून अधिक तरुण आणि शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याच्या प्रत्यक्ष कार्यशाळेत सहभाग घेतला.
Mumbai : विद्यार्थ्यांनी घडवल्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती
Mumbai : विद्यार्थ्यांनी घडवल्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती(Photo - Vijay Gohil)
Published on

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईतील ५० हून अधिक तरुण आणि शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याच्या प्रत्यक्ष कार्यशाळेत सहभाग घेतला. ‘नवशक्ति - द फ्री प्रेस जर्नल’ आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने, हरित मोहिमेचा एक भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

फ्री प्रेस हाऊस येथे आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा ‘एफपीजे इको गणेश महापौर पुरस्कारा’च्या सातव्या पर्वाची पूर्वतयारी म्हणून घेण्यात आली. हा पुरस्कार मुंबईतील अशा कुटुंबांचा गौरव करतो, जे घरात पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्तींची स्थापना करतात.

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या तज्ज्ञ मूर्तिकारांनी सहभागींना नैसर्गिक शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती घडवण्याविषयीचे मार्गदर्शन केले. या मार्गदर्शकांमध्ये प्रशांत इप्ते, वैभव मोरे, मयुरेश आंध्याळ, माहेश्वरी ढोरे, सिद्धार्थ गायकवाड आणि किरण केसरकर यांचा समावेश होता.

या स्पर्धेतील सहभागी उमेदवारांनी मातीकाम/मूर्तीकामाची मूलभूत तंत्रे शिकून घेतली, ज्यामध्ये मूर्तीचा पाया तयार करणे, आकार देणे आणि चेहऱ्याचे बारीक तपशील कोरणे यांचा समावेश होता. मार्गदर्शकांनी रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक व पाण्यावर आधारित रंगांचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक दाखवले.

तसेच, मातीच्या मूर्ती घरातील बादलीत किंवा पात्रात विसर्जन केल्यास त्या कशा सहज विरघळतात आणि यामुळे मुंबईतील जलस्रोतांचे प्रदूषण कसे रोखले जाते, हेही त्यांनी समजावून सांगितले. या सत्राला ‘रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘घासवाला व्हिजन फाऊंडेशन’ यांसारख्या स्वयंसेवी संस्थांचे सदस्यही उपस्थित होते. या कार्यशाळेने सहभागींना गणेशोत्सव साजरा करताना शाश्वत आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in