मुंबईतील उपनगरीय रेल्वेसाठी ५२,७२४ कोटी खर्च करणार; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

मुंबईतील उपनगरीय रेल्वे जाळे सुधारण्यासाठी केंद्र सरकारने ५२,७२४ कोटी रुपयांच्या योजनेला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प दोन, तीन, तीन-ए अंतर्गत हा खर्च केला जाणार आहे, असे उत्तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत लेखी प्रश्नावर शुक्रवारी दिले.
मुंबईतील उपनगरीय रेल्वेसाठी ५२,७२४ कोटी खर्च करणार; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
Published on

मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वे जाळे सुधारण्यासाठी केंद्र सरकारने ५२,७२४ कोटी रुपयांच्या योजनेला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प दोन, तीन, तीन-ए अंतर्गत हा खर्च केला जाणार आहे, असे उत्तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत लेखी प्रश्नावर शुक्रवारी दिले.

मुंबई उपनगरीय रेल्वेवर वाढती प्रवाशांची संख्या व मुंबई प्रादेशिक प्रदेशात दळणवळण सुधारण्यासाठी विविध प्रकल्प राबवले जात आहेत.

‘एमयूटीपी-२’साठी ८,०८७ कोटी, ‘एमयूटीपी-३’साठी १०,९४७ कोटी तर ‘एमयूटीपी-३ ए’साठी ३३,६९० कोटींची तरतूद केली आहे. हे प्रकल्प मुंबई रेल्वे विकास महामंडळ लिमिटेडमार्फत (एमआरव्हीसी) राबवले जात आहेत. या ‘एमआरव्हीसी’तर्फे राबवल्या जाणाऱ्या प्रकल्प खर्चात रेल्वे खात्याची व महाराष्ट्र सरकारची ५०:५० टक्के भागीदारी आहे.

सध्या ‘एमयूटीपी-३’चे काम प्रगतीपथावर आहे. त्यात पनवेल-कर्जत उपनगरीय मार्गिका, विरार-डहाणू चौपदरीकरण, ऐरोली-कळवा उन्नत मार्गिका आदी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत.

मुंबई सेंट्रल-बोरिवली दरम्यान सहा मार्ग आहेत. तो मार्ग आठ पदरी केला जाईल. तर बोरिवली-विरार मार्ग सहा पदरी करण्यात येणार आहे. सीएसएमटी-कुर्लादरम्यान पाचवा-सहावा मार्ग मंजूर करण्यात आला आहे. कुर्ला व परळ या स्थानकादरम्यान प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

१२ डब्यांच्या २३८ नवीन गाड्यांना मंजुरी

उपनगरी रेल्वे यंत्रणा सुधारण्यासाठी १२ डब्यांच्या २३८ नवीन गाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी ‘एमयूटीपी-३’ व ‘एमयूटीपी-३ ए’ प्रकल्पात १९,२९३ कोटींची तरतूद केली आहे. गर्दीच्या काळात गर्दी कमी करण्यासाठी व प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

मेट्रो स्टेशनला जोडण्याचे प्रयत्न

‘रेल्वे नेटवर्क’चा विस्तार करताना शहरांमध्ये दळणवळण सुलभ होण्यासाठी उपनगरीय रेल्वे स्थानके-मेट्रो स्टेशनला जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्या अंधेरी पूर्व व घाटकोपर रेल्वे स्थानक मेट्रो रेल्वेला जोडले आहेत. आता आणखी रेल्वे स्थानके मेट्रोला जोडण्यासाठी ‘एमएमआरडीए’शी समन्वयाद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत.

अमृत भारत स्टेशन योजनेत देशातील १,३३७ रेल्वे स्टेशन्स आधुनिक बनवण्यात येणार आहेत. त्यापैकी १३२ स्टेशन ही महाराष्ट्रातील आहेत. मुंबईतील परळ, चिंचपोकळी, वडाळा, माटुंगा, शहाड ही रेल्वे स्थानके आधुनिक केली जाणार आहेत.

८९ टक्के रेल्वे तिकीट बुकिंग ऑनलाईन

देशातील ८९ टक्के रेल्वे तिकीटांची सध्या ऑनलाईन बुकिंग होत आहेत, अशी माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली. ‘आयआरसीटीसी’ने २.५ कोटी संशयित बनावट खाती रद्द केली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in