मुंबई : शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत एका डॉक्टरसह तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गोरेगाव आणि कांदिवली परिसरात घडली. आत्महत्या केलेल्यांमध्ये डॉ. रवी यादव आणि प्रथम कृष्णा नाईक यांचा समावेश असून, यादव यांनी गळफास, तर प्रथम याने इमारतीवरून उडी घेऊन जीवन संपविल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गोरेगाव आणि कांदिवली पोलिसांनी दोन स्वतंत्र अपमृत्यूची नोंद केली आहे.
प्रथम हा कांदिवलीतील लालजीपाडा, गणेशनगरच्या रिहा अपार्टमेंटमध्ये इमारतीमध्ये त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहत होता. तीन दिवसांपूर्वीच तो इन्फिनिटी मॉलच्या एका पिझ्झा शॉपमध्ये नोकरीला लागला होता. तीन दिवस कामावर गेल्यानंतर तो सोमवारी कामावर गेला नाही. त्याच्या शॉपमधून वडिलांना फोन आल्यानंतर त्यांनी त्याचा शोध घेतला. यावेळी प्रथम हा डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशनजवळ बसला होता. त्याची समजूत काढून ते त्याला घेऊन घरी आले होते. काही वेळानंतर तो इमारतीच्या २३ व्या मजल्यावर गेला आणि त्याने इमारतीच्या डक येथून उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल केले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. दुसऱ्या घटनेत गोरेगाव येथे डॉ. रवी यादव यांनी गळफास घेऊन जीवन संपविले. त्यांच्याकडे पोलिसांना कुठलीही सुसाईट सापडली नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. रवी यादव हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत डोंबिवली परिसरात राहत होते. सध्या ते शिपला कंपनीत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. सोमवारी रात्री उशिरा ते त्यांच्या गोरेगाव येथील मित्राकडे आले होते. यावेळी त्यांनी बेडरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती नंतर गोरेगाव पोलिसांना देण्यात आली होती. रवी यादव हे काही दिवसांपासून मानसिक तणावात होते, त्यातून आलेल्या नैराशातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे.