चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला आव्हान; टाटा ट्रस्टची मुंबई उच्च न्यायालयात धाव

सर दोराबजी टाटा ट्रस्ट (एसडीटीटी) आणि आर. डी. टाटा ट्रस्ट (आरडीटीटी) यांनी टाटा सन्स आणि कंपनीच्या सहा संचालकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कार्यकारी अध्यक्षपदी एन. चंद्रशेखरन यांची तिसऱ्यांदा पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी कर
चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला आव्हान; टाटा ट्रस्टची मुंबई उच्च न्यायालयात धाव
चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला आव्हान; टाटा ट्रस्टची मुंबई उच्च न्यायालयात धाव
Published on: 

मुंबई : सर दोराबजी टाटा ट्रस्ट (एसडीटीटी) आणि आर. डी. टाटा ट्रस्ट (आरडीटीटी) यांनी टाटा सन्स आणि कंपनीच्या सहा संचालकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कार्यकारी अध्यक्षपदी एन. चंद्रशेखरन यांची तिसऱ्यांदा पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आलेल्या पुनर्नियुक्तीला दोन्ही ट्रस्टनी आव्हान दिले आहे.

चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीसाठी १७ सप्टेंबर रोजी संचालक मंडळाने मंजूर केलेला ठराव या वादाच्या केंद्रस्थानी आहे. टाटा सन्सच्या घटनेतील (आर्टिकल्स ऑफ असोसिएशन) कलम १२१ नुसार आवश्यक असलेला अनुकूल मतदानाचा निकष पाळला गेला नसल्याने हा ठराव अवैध असल्याचा दावा ट्रस्टनी केला आहे.

संचालक मंडळाच्या ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत संचालकांमध्ये मतभेद झाल्यास अध्यक्षांना निर्णायक मताचा अधिकार (कास्टिंग व्होट) वापरण्यापासून रोखण्याचे निर्देश देण्याची मागणी ट्रस्टनी केली आहे. उच्च न्यायालयाचे एकल न्यायमूर्तींचे खंडपीठ आज, शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी घेण्याची शक्यता आहे.

नोएल टाटा यांच्या अध्यक्षतेखालील टाटा ट्रस्ट्सचा टाटा सन्समध्ये सुमारे ६६ टक्के हिस्सा आहे. २० सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात दोन्ही ट्रस्टनी संचालक मंडळाचा ठराव योग्य रितीने मंजूर झाला नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्याला कायदेशीर मान्यता नसल्याचा दावाही त्यांनी केला होता.

टाटा सन्सच्या घटनेनुसार ट्रस्टच्या नामनिर्देशित संचालकांना विशेष मतदान संरक्षण देण्यात आले आहे. ट्रस्टचे दोन प्रतिनिधी संचालक मंडळावर आहेत. त्यामध्ये नोएल टाटा आणि वेणू श्रीनिवासन यांचा समावेश आहे. १७ सप्टेंबरच्या बैठकीत नोएल टाटा यांनी चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध केला, तर वेणू श्रीनिवासन यांनी समर्थन केले होते.

ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या नामनिर्देशित संचालकांपैकी बहुसंख्य संचालकांचा अनुकूल पाठिंबा मिळाल्याशिवाय चंद्रशेखरन यांची पुनर्नियुक्ती मंजूर होऊ शकत नाही. हा नियम टाटा सन्सच्या घटनेत स्वतंत्र अट म्हणून असून, संचालक मंडळाच्या साध्या बहुमताने त्यावर मात करता येणार नाही, असा युक्तिवाद ट्रस्टनी केला आहे.

६८ कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी

गुरुवारी दाखल करण्यात आलेल्या स्वतंत्र याचिकांमध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्टने ५० कोटी रुपये, तर आर. डी. टाटा ट्रस्टने १५ कोटी रुपये नुकसानभरपाईची मागणी केली आहे. या रकमेवर वार्षिक १८ टक्के व्याज देण्याची मागणीही दोन्ही ट्रस्टनी केली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)