मुंबईतील टॅक्सीचालकांचा १५ सप्टेंबरपासून सुरू होणारा संप टळला आहे. त्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्याबाबत पुढच्या चार दिवसांत संबंधित यंत्रणांशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच दरवाढीच्या मागणीबाबत पुढच्या १० दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी नियोजित संप मागे घेतला असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुंबईतील टॅक्सीचालकांनी येत्या १५ सप्टेंबरपासून संप पुकारण्याचा इशारा दिला होता. त्यांच्यासोबत चर्चा करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर सोपविली होती. उदय सामंत यांनी टॅक्सीचालक-मालक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. पोलीस तसेच इतर यंत्रणांशी निगडित त्यांचे जे प्रश्न आहेत, त्याबाबत चार दिवसांत चर्चा करण्यात येईल. तसेच त्यांच्या दरवाढीच्या मागणीबाबत पुढच्या १० दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. टॅक्सीचालकांनी एक दिवस जरी संप केला तरी सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात अडचण होत असते, हे लक्षात घेऊन संप करू नये, असे आवाहन त्यांना करण्यात आले. टॅक्सीचालकांनी ते मान्य करून संप रद्द केल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.