

मुंबई : ‘क्षयरोगमुक्त मुंबई’ यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरीही विविध आरोग्य संस्थांमध्ये वर्ष २०२५ मध्ये मुंबईत एकूण ५४ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद झाली असून यापैकी ४८ हजार ८३५ रुग्ण मुंबईचे रहिवासी होते. यापैकी ४० टक्के रुग्ण एक्स्ट्रा पल्मनरी, ६ टक्के बालरुग्ण आणि ८ टक्के औषध प्रतिरोधक क्षयरोग प्रकारातील होते. मंगळवारी जागतिक क्षयरोग दिन असून मुंबई टीबीमुक्त अभियान सुरु करण्यात आले आहे.
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने २०२५ मध्ये ‘क्षयरोगमुक्त भारत अभियान’ सुरू केले. या कार्यक्रमांतर्गत १३ लाख ८ हजार २०० संवेदनशील लोकसंख्येची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ लाख २४ हजार ७७४ संशयित रुग्णांचे एक्स-रे करण्यात आले. औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे रुग्ण बरे होण्याचा दर गेल्या ८ वर्षात दुप्पट होऊन ८१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जागतिक क्षयरोग दिन २४ मार्च रोजी असून २०२६ चे घोषवाक्य ‘यस, वुई कॅन एन्ड टीबी’ लेड बाय कंट्रीज, पॉवर्ड बाय पिपल’ असे आहे.
निदान सुविधांचे उन्नतीकरण
मुंबईतील आरोग्य संस्थांच्या ठिकाणी ४५ सीबीएनएएटी आणि ३४ ट्रूनॅट पोर्टेबल मशीन उपलब्ध आहेत. या संयंत्राद्वारे क्षयरोग व रिफॅम्पिसीन औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचे मोफत व अचूक निदान केले जाते. तसेच आता केंद्रीय क्षयरोग विभागाकडून ४ पॅथोडिटेक्ट मशीनही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या संयंत्राद्वारे क्षयरोग तसेच रिफॅम्पिसीन व आयसोनाझेड औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचे देखील निदान करणे होईल. सध्या २ पॅथोडिटेक्ट संयंत्रे सर जे.जे. रूग्णालय व आयआरएल जीटीबी प्रयोगशाळेत उपलब्ध झाली आहेत. वर्ष २०२५ मध्ये एकूण २ लाख मॉलीक्यूलर चाचण्या करण्यात आल्या.
पौष्टिक आहार किट
निक्षय मित्रांच्या माध्यमातून दरमहा टीबी रुग्णांना सहा महिन्यांकरिता पौष्टिक आहार किट देण्यात येते. मागील २ वर्षांत निक्षय पोषण योजनेअंतर्गत एकूण १,४८,८६७ रेशन किट वितरित करण्यात आले.
क्षयरोग प्रतिबंधक उपक्रम
सीवाय-टीबी चाचणीद्वारे लक्षणे नसतानाही संसर्ग ओळखता येतो. २०२५ मध्ये १३,३११ उच्च जोखीम व्यक्तींची तपासणी झाली, त्यापैकी १९६१ पॉझिटिव्ह आढळले व १६५५ जणांना प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले.
हँडहेल्ड एक्स-रे मशीन
२४ मशीनपैकी १९ मशीन १६ उपनगरीय रुग्णालये व जीटीबी रुग्णालयात उपलब्ध आहेत. सीएसआरअंतर्गत विभागस्तरावर आणखी २४ मशीन एक्स-रे तपासणीसाठी वापरात आहेत. याद्वारे आतापर्यंत वर्ष २०२५-२०२६ मधे एकूण ७४३०७ रुग्णांचे एक्सरे काढण्यात आले आहेत.
खोकला, ताप, वजन घटणे टीबीची लक्षणे!
दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, ताप, वजन घटणे, रात्री घाम येणे, भूक न लागणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, रक्त किंवा कफ खोकल्यातून येणे, थकवा, मानेला सूज वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करू नये. नागरिकांनी जवळचा बीएमसी दवाखाना, हेल्थ पोस्ट किंवा ‘आपला दवाखाना’ येथे जाऊन मोफत तपासणी व उपचार करून घ्यावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.