शिक्षकांना निवडणुकीसाठी एकाच वेळी दोन ठिकाणी ड्युटी; निवडणूक कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत

पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी मुंबईतील शिक्षकांना निवडणूक ड्युटी देण्यात आली आहे. मात्र...
(प्रातिनिधिक छायाचित्र)
(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : निवडणूक आयोगाकडून राज्यात पाचव्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरु वेगाने आहे. पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी मुंबईतील शिक्षकांना निवडणूक ड्युटी देण्यात आली आहे. मात्र काही शिक्षकांना दोन ठिकाणी निवडणूक ड्युटी दिल्याने शिक्षक हैराण झाले आहेत.

मुंबईमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया २० मे रोजी होणार आहे. मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेले शिक्षक व इतर राज्य सरकारी कर्मचारी प्रशिक्षण व बॅलेट वोट करण्यासाठी आज गोरेगाव पूर्व दिंडोशी येथील पशूवैद्यकीय महाविद्यालयात असंख्य कर्मचारी उपस्थित होते. येथे आलेल्या काही शिक्षकांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आल्याने शिक्षक त्रस्त झाले होते.

अंधेरी येथील शिक्षक उदय नरे यांना दोन ठिकाणी निवडणूक ड्युटी देण्यात आली आहे. गोरेगाव आणि वांद्रे येथे ड्युटी देण्यात आल्याने १९ आणि २० तारखेला दोन्ही पैकी कोणत्या ठिकाणी काम करायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. याबाबत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, पहिली ऑर्डर आलेल्या ठिकाणी कामासाठी रुजू व्हावे, असा सल्ला देत मुख्याध्यापकांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे ते संभ्रमात आहेत. अशीच अवस्था बऱ्याच शिक्षकांची असल्याचे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in