
मुंबई : मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांमधील अनियमितता, प्रलंबित कामे, भ्रष्टाचार याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
विविध मागण्यांसाठी १३ जून रोजी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. याबाबतची सूचना शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह विविध अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे संघटनेचे सचिव प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.
शिक्षकांच्या मागण्यांबाबत मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने शिक्षण उपसंचालक यांची भेट घेतली होती.
सेवेतील शिक्षकांना सेवेतून कमी करून नवीन शिक्षकाला नियुक्ती दिली जात असल्याबाबतच्या तक्रारीचे निराकरण करण्याकडे उपसंचालक कार्यालयाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिक्षकांची संख्या कमी करणे, सेवेतील शिक्षकाला उचित लाभ न देणे अशा प्रकारामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला असून याविरोधात आता आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
शिक्षकांकडून करण्यात आलेल्या मागण्या
अनियमितता, समस्यांच्या निराकरणात होणारा विलंब, अल्पसंख्यांक संस्थांमधील भरतीमधील भ्रष्टाचार दूर करावा
मुंबई विभागातील सर्व प्रलंबित नियुक्ती मान्यता तातडीने द्यावा
नियम डावलून केलेल्या सर्व संचमान्यता सुधारण्यात याव्यात
सर्व प्रलंबित वेतन देयके विनविलंब मंजूर करावीत
सर्व शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला करावेत
२०१२ मध्ये नियुक्त केलेल्या नियुक्ती दिनांकापासून मान्यता देण्यात यावी.