मुंबई : जानेवारी महिन्यात मुंबईत थंडी पसरलेली असते. आल्हाददायक वातावरणाचा अनुभव मुंबईकर घेत असतात. यंदा जानेवारीच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्या आहेत. सकाळी १० वाजता उन्ह भाजून काढत आहेत. त्यामुळे घराबाहेर पडणे नकोसे बनले आहे.
मुंबईत रविवारी कमाल ३३ तर किमान २२ अंश तापमान नोंदवले गेले. येते चार ते पाच दिवस हे तापमान कायम राहणार आहे. सर्वसाधारणपणे जानेवारीत शहरातील तापमान १६ ते १९ अंश असते. हवेत गारवा असतो. त्यामुळे मुंबईकर आरामात फिरत असतात. यंदा जानेवारीत तापमानात मोठे बदल झालेले दिसत आहेत.
कुलाबा येथील भारतीय हवामान खात्याचे प्रमुख व ज्येष्ठ शास्त्रज्ञ सुनील कांबळे म्हणाले की, दरवर्षी उत्तरेकडून हिमालयाच्या रांगातून येणारे वारे मुंबईत गारवा पसरवतात. या वाऱ्याद्वारे संपूर्ण देशात हिवाळा पसरतो. पण, यंदा काश्मीर आणि हिमालय पर्वतरांगांमध्ये बर्फ वाहून नेणारा कोणतेही वारे नाहीत. त्यामुळे जम्मू-काश्मीर भागात बर्फवृष्टी झालेली नाही. अनेक पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये बर्फात खेळायला गेले आहेत. मात्र, ते बर्फ न पडल्याने नाराज झाले आहेत. हिमालयात बर्फ न पडल्याने मुंबईच्या तापमानात घट झालेली नाही. महाराष्ट्रातही थंडीची लाट पसरलेली नाही, असे कांबळे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ही उष्णतेची लाट येते काही दिवस कायम राहणार आहे. शहरात किमान तापमान २२ अंश तर कमाल तापमान ३२ अंश राहणार आहे.
मुंबईचा हवेचा दर्जा रविवारी १०२ होता. तर सायन, माझगाव व शिवडी भागात हवेचा दर्जा १०० ते १२५ होता