
मुंबई/ठाणे : दहीहंडीच्या थरारात मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी अपघातांच्या घटना घडल्या असून आतापर्यंत मुंबईत ३० आणि ठाण्यात ९ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात ५, नायर रुग्णालयात १, ट्रॉमा रुग्णालयात २ तर संलग्न रुग्णालयांमध्ये ४ अशा एकूण ३० गोविंदांवर उपचार सुरू आहेत. यापैकी १५ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून उर्वरित १५ गोविंदांवर उपचार सुरू आहेत. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे. दरम्यान ठाण्यात देखील विविध दहीहंडीच्या
ठिकाणी थरावर थर रचताना अपघात घडले. यात ९ गोविंदा जखमी झाले असून त्यामध्ये लहान मुलांसह तरुणांचा समावेश आहे. यातील ४ गोविंदांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात तर ५ जणांना ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये मुंबई आणि ठाण्यातील नागरिकांचा समावेश असून रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार काही जणांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापती झाल्या आहेत.