
मुंबई : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, अचानक गुरुवारी संध्याकाळी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे दिवाळीनिमित्त खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पडलेल्या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. मुंबईसह नवी मुंबईत जोरदार पाऊस पडल्याने कामावरून घरी जाणाऱ्यांची गैरसोय झाली. राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास संपला असला तरी पावसाच्या आगमनामुळे फटाके फोडायचे की छत्री घेऊन बाहेर पडायचे, हा प्रश्न आता नागरिकांना सतावू लागला आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, वसई-विरार, विक्रोळी परिसरात अचानक झालेल्या पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात आलेल्या नागरिकांची आणि विक्रत्यांची मोठी तारांबळ उडाली. या पावसामुळे काही भागांमध्ये बत्तीगुल झाली. संध्याकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात तयार झालेले भात कापून ठेवण्यात आले आहे, मात्र पावसाच्या आगमनामुळे त्याला फटका बसण्याची शक्यता आहे.
गुलाबी थंडीऐवजी ६-७ दिवस पावसाचा इशारा
यावर्षीच्या दिवाळीत गुलाबी थंडीऐवजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताच अधिक आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील ६ ते ७ दिवसांमध्ये महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. १९ ते २१ ऑक्टोबरदरम्यान मुंबईतील अनेक भागात ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून पावसाच्या सरी बरसतील. या काळात मुंबईतील बहुतांश भागात तापमान २३ ते ३६ अंश सेल्सियस इतके राहण्याची शक्यता आहे.