

मुंबई : गौरी-गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना मुंबई बाहेर पडताना नाकीनऊ आले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. या तिन्ही शहरातून बाहेर पडण्यासाठी ४-४ तास लागत असल्याचे चित्र दिसत होते. भांडुप ते तुर्भे या एका तासाच्या प्रवासाला तब्बल साडे तीन तास लागले. यामुळे प्रवासी वैतागले आहेत.
येत्या सोमवारी गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. आज शुक्रवारी रात्रीपासूनच कोकणात जाणाऱ्या भक्तांची गर्दी उसळली आहे. कोकण रेल्वेने विविध गाड्या सोडल्या तरीही प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेल्वेचे तिकीट न मिळालेल्या भाविकांनी रस्ते मार्गाने गावी जाण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून कोकणात मोफत एसटी गाड्या, लक्झरी बस सुटल्या आहेत. घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या वाहनांमुळे शुक्रवारी रात्री ठाणे आणि नवी मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, शिळफाटा तसेच ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. ठाणे जिल्ह्यात कोकणपट्ट्यातील नागरिक मोठ्याप्रमाणात वास्तव्य करतात. कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी समूह पद्धतीने एसटीची नोंदणी केली आहे. या एसटी बसगाड्या शुक्रवारी कोकणाच्या दिशेने रवाना करण्यात आल्या. तसेच, अनेकजण त्यांच्या खासगी वाहनाने रायगड, रत्नागिरीच्या दिशेने निघाले होते.
प्रवासाला आम्ही वैतागलो
ठाणे ते वाशी हे अर्धा ते पाऊण तासाचे अंतर पार करण्यास वाहन चालकांना किमान दोन ते तीन तास लागले. कोकणात गावी जाणाऱ्या गौरी परब यांनी सांगितले की, आम्ही दुपारी साडे तीन ते चार वाजल्यापासून माझ्या बसची भांडुपला वाट पाहत होतो. पण, ती आली पावणे सहा वाजता. प्रवासी भरल्यानंतर ती ६.१५ वाजता सुटली. पावणे नऊ वाजेपर्यंत आम्ही जेमतेम आयरोलीपर्यंत पोहचलो. आमचे प्रचंड हाल होत आहेत. रात्री ९.३० वाजेपर्यंत आम्ही तुर्भेला पोहचलो. जेवणापासून पाण्यापर्यंत सर्वच हाल होत आहे.