

मुंबई : जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केले असून रायगड जिल्ह्यासाठी गुरुवारी रेड अलर्ट जारी केले आहे.
मुंबईत पाऊस सक्रिय झाला असून सोमवार रात्रीपासून पावसाचा जोर कायम होता. मंगळवारी सकाळी काहीसा प्रमाणपत्र जोर ओसरला तरी अधूनमधून जोरदार सरी बरसत होत्या. दरम्यान, सोमवार रात्रीपासून बरसणाऱ्या पावसामुळे ३६ ठिकाणी झाड व झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या, तर १३ ठिकाणी शाॅर्टसर्किटच्या घटना घडल्या.
मागील दोन - तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारीही सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पाऊस सक्रीय होत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
दक्षिण मुंबईत गेल्या तीन वर्षांतील हा सर्वात कमी जूनमधील पाऊस ठरला आहे. कुलाबा येथे जून २०२५ मध्ये ५९२ मिमी, तर जून २०२४ मध्ये ५०७ मिमी पावसाची नोंद झाली होती. उपनगरांतील सांताक्रूझ येथेही गेल्या वर्षी जूनमध्ये ५९२ मिमी पाऊस झाला होता. त्याच्या तुलनेत यंदाचा पाऊस लक्षणीयरीत्या कमी पडला आहे.
मुंबई- ठाणे पावसाचा अलर्ट
१ जुलै : ऑरेंज अलर्ट – मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
२ जुलै : ऑरेंज अलर्ट – काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस
३ जुलै : ऑरेंज अलर्ट – अतिवृष्टीची शक्यता
४ जुलै : ऑरेंज अलर्ट – मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस
तीन वर्षांतील कमी पाऊस
१ ते ३० जून या कालावधीत कुलाबा वेधशाळेत ४४१.१ मिमी पावसाची नोंद झाली. जून महिन्याची सरासरी ५४२.३ मिमी असल्याने यंदा केवळ ८१ टक्के पावसाची नोंद झाली आहे, तर सांताक्रूझ वेधशाळेत ४१६.४ मिमी पाऊस झाला असून, तो जूनच्या सरासरी ५३७.१ मिमीच्या तुलनेत केवळ ७७ टक्के आहे.