
पूनम पोळ / मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस प्रदूषणाचा आलेख वाढत असून मुंबई महापालिकेने प्रदूषणविरोधी मोहीम आणि कारवाई आक्रमक पद्धतीने सुरू आहे. मात्र एकीकडे पालिकेची प्रदूषणविरोधी आघाडी आणि यंत्रणा मात्र अपुरे असल्याचे चित्र समोर आले आहे. हवेची गुणवत्ता मोजणारी पालिकेकडील एकमेव गुणवत्ता निर्देशांक मोबाईल व्हॅन नादुरुस्त आहे. त्यामुळे विकासकांवर कारवाईचा बडगा उगारला जात असताना पालिका कशाच्या आधारावर कारवाई करणार हा प्रश्न निर्माण होतो आहे.
मुंबई महापालिकेच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या माध्यमातून आयुक्तांच्या निर्देशानुसार गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील प्रदूषणाविरोधात जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष यांच्या वतीने मुंबईतील प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करीत प्रदूषण रोखण्यासाठी अनेक उपाययोजना मार्गदर्शक सूचना आणि प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईतील विकासकामांमुळे होणारे प्रदूषण हे सर्वाधिक असल्याने त्यावर निर्बंध आणि उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, पालिकेकडे यासाठी लागणारी यंत्रणा अपुरी आहे आणि यासाठीच लागणारी यंत्रणा लवकरात घेण्याचा पालिकेच्या मानस असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र दूषणाचा मुद्दा अग्रेसर असतानाही पालिकाकडे यंत्रणा नाही यामुळे पालिका प्रशासनाच प्रदूषणाबाबतीत गंभीर आहे का ? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
पालिकेकडे केवळ २८ सनियंत्रण यंत्रे
मुंबईतील हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी पालिकेकडे गुणवत्ता निर्देशांक नोंदवणारी केवळ २८ सनियंत्रण यंत्रे उपलब्ध आहेत. मुंबईसारख्या महानगरात यंत्रे ७० च्या आसपास असणे अपेक्षित आहे. तसेच बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम साइटवर स्वतःची गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रे कार्यान्वित करावी आणि महापालिकेने वारंवार जाऊन त्याचे तपासणी करावी, असे अपेक्षित आहे, मात्र याकडेही पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. तसेच, येत्या कालावधीत ५ सानियंत्रण यंत्र घेण्याच्या विचारात असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
पालिकेकडे एकच मोबाईल व्हॅन, तीही नादुरुस्त
हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी आणि विशेष पथकाद्वारे कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेक डे केवळ एकच मोबाईल व्हॅन उपलब्ध आहे. आणखी चार मोबाईल व्हॅन घेण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने २०२३ मध्ये मांडला आहे. त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेली एकमेव मोबाईल व्हॅन नादुरुस्त असल्याचे या विभागाचे प्रमुख अविनाश काटे यांनी सांगितले. एकीकडे प्रदूषण रोखण्यासाठी जोरदार कारवाई करण्याचा महापालिकेचा मनसुबा असला तरी प्रत्यक्षात मात्र अपुऱ्या यंत्रणांमुळे महापालिका कितपत कारवाई करू शकते, हा प्रश्न आहे.