

मुंबई : विनातिकीट महिला प्रवाशांसोबत संवाद करणे तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांना अडचणीचे झाले आहे. काही महिलांकडून नाहक आरोप होत असल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघ ही संघटना मैदानात उतरली असून कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्यावी, या मागणीसाठी संघटनेने सीएसएमटी स्थानकात गुरुवारी आंदोलन केले.
विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून करोडो रुपयांचा महसूल रेल्वे प्रशासनाला मिळवून देणाऱ्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांत विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी अनेक तिकीट तपासनीस कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र पुरुष कर्मचाऱ्यांनी महिला प्रवाशांकडे तिकिटाबाबत विचारणा केल्यास त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातून तिकीट तपासनीसांना न्यायालयात खेचण्यात येत असल्याने तिकीट तपासनीस त्रस्त झाले आहेत.
त्यामुळे तिकीट तपासणीसांना आरपीएफ दलाचे संरक्षण देण्यात यावे, न्यायालयातील त्यांच्या खटला रेल्वे प्रशासनाने लढावा, अशा विविध मागण्यांसाठी गुरुवारी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक-८ वर आंदोलन केले. यावेळी संघटनेचे विभागीय सचिव संजीव कुमार दुबे यांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
महिला प्रवाशाची तिकीट तपासनीसाला धक्काबुक्की
पश्चिम रेल्वे मार्गावर बुधवारी विरार ते चर्चगेट दरम्यानच्या वातानुकूलित लोकलमध्ये महिला प्रवाशाकडून तिकीट तपासनीसाला धक्काबुक्की झाल्याचे समोर आले आहे. अंधेरी ते वांद्रेदरम्यान तिकीट तपासणी करताना ६ प्रवासी सामान्य लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या तिकिटावर एसी लोकलमधून प्रवास करत असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना दंड भरण्यास सांगितले. मात्र या प्रवाशांनी गोंधळ घालत तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. यावेळी एका तिकीट तपासनीसला महिलेने धक्काबुक्की केली. लोकल दादर येथे आली असता, त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.