

मुंबई : 'एल निनो'च्या प्रभावामुळे पावसाने ओढ दिल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची स्थिती लक्षात घेता औद्योगिक व व्यावसायिक पाणी वापरात २० टक्के कपात बुधवारपासून लागू करण्यात आली आहे. तसेच सर्व बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडित करण्यात येणार असून नवीन बांधकामांना नवी जलजोडणी देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सर्व जलतरण तलावांच्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडित करण्यात येणार आहेत. दरम्यान, पाण्याचा गैरवापर आणि अपव्यय केल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे.
‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाने ओढ दिल्याने आणि मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट झाल्याने उपलब्ध पाणीसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
याअंतर्गत मुंबईत १५ मे पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगर पालिकेने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करत काटकसरीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार, महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने पाणी कपातीच्या कालावधीत करावयाच्या उपायोजनांबाबत सविस्तर परिपत्रक निर्गमित केले आहे.
उपलब्ध पाणीसाठा टिकविण्याचे आव्हान
मुंबई शहर व उपनगरांसाठी सध्या प्रतिदिन सुमारे ४ हजार ६६४ दशलक्ष लीटर इतकी पाण्याची आवश्यकता आहे. उपलब्ध पर्यायामधून मुंबई महानगराला प्रतिदिन सरासरी ४ हजार १०० दशलक्ष लीटर इतके पाणी पुरविले जाते. खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाच्या सुचनेनुसार मुंबईत १५ मे पासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. सद्यस्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली असून मंगळवारी १६ जून रोजी उपलब्ध पाणीसाठा हा १०.३५ टक्के इतकाच शिल्लक आहे. पावसाळा लांबल्याने हा पाणीसाठा अधिकाधिक दिवस टिकविण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर आहे.
जलतरण तलावांच्या जोडण्याही खंडित
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार, पाण्याच्या इतर वापरावरही बुधवार १७ जून २०२६ पासून आवश्यक मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार, सर्व बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडित करण्यात येत आहेत. नवीन बांधकाम जलजोडणी पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत मंजूर करण्यात येणार नाहीत. सर्व जलतरण तलावांना देण्यात आलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडित करण्यात येत आहेत. जलजोडणीधारकांकडून वाढीव जलजोडणी किंवा अतिरिक्त जलजोडणीकरिता अर्ज प्राप्त झाल्यास पुरेसा पाणीसाठा तयार होईपर्यंत मागणी प्रलंबित ठेवण्यात येणार आहे. औद्योगिक व व्यापारी तसेच स्पोर्ट्स क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. एरीअेटेड वॉटर व पॅकेज वॉटर बॉटलिंग प्लांटला दिलेल्या जलजोडण्यातून होणारा पाणीपुरवठा तेथील कामगारांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेइतका कमी करण्यात येत आहे.
अन्य कामांसाठी टँकर, बोअरवेलच्या पाण्याचा वापर
सार्वजनिक स्वच्छतागृह व प्रसाधनगृह सांभाळणाऱ्या संस्थांनी जास्तीत जास्त टँकर किंवा बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा व पिण्याच्या पाण्याची बचत करावी. पिण्याच्या पाण्याच्या वापराव्यतिरिक्त, इतर वापरासाठी विहिरी, कूपनलिका, कूपविहिरी यांचा जास्तीत जास्त वापर करावा. वाहन धुणे, उद्यानांमधील झाडांना पाणी घालणे, रस्ता किंवा परिसर धुण्यासाठी बोअरवेल अथवा विहिरीच्या पाण्याचा वापर करावा.
आस्थापनांनी प्रक्रियायुक्त पाण्याचा फेरवापर करावा
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, आरसीएफ, एचपीसीएल, बीपीसीएल, नेव्ही, एमआयडीसी, बीपीटी आदी आस्थापनांनी दुय्यम वापरासाठी व परिचालनासाठी कुलाबा तसेच इतर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील प्रक्रियायुक्त पाण्याचा फेरवापर करावा, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करत कोणत्याही ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पुरवठा करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा गैरवापर आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.
पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा : मुख्यमंत्री
राज्यभरात पावसाने दडी मारल्याने मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. पाऊस लांबल्याने केवळ एक टक्का धूळपेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने बैठकीत दिली. शेतकऱ्यांनी पुढील सूचना येईपर्यंत पेरण्या न करण्याचे आवाहन करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिले. तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा. पाणी पुरेल याची दक्षता घ्या, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.