

मुंबई : मुंबईला अधिक स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पिसे पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात ९१० दशलक्ष लिटर क्षमतेचे नवे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून, मुंबई महापालिका सल्लागाराला २३ कोटी रुपये मोजणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी भातसा धरणातून मुंबईला होणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण पिसे पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात केले जाते. आशिया खंडातील सर्वात मोठ्या जलशुद्धीकरण संकुलांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या केंद्रातून मुंबई महानगरपालिकेच्या बहुतांश भागांना पाणीपुरवठा केला जातो. हा प्रकल्प तीन टप्प्यांत उभारण्यात आला असून पहिल्या टप्प्यातील जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी १९७९ मध्ये करण्यात आली होती. तब्बल ४७ वर्षांपासून या केंद्राचा वापर सुरू असल्याने आणि क्लोरीनसारख्या रसायनांच्या सतत संपर्कामुळे या केंद्राच्या संरचनेची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. त्यामुळे या जुन्या प्रकल्पाचे आयुर्मान संपुष्टात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
संपूर्ण प्रकल्पासाठी १,६८५ कोटींचा खर्च
भविष्यात पाणीपुरवठ्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी जुन्या प्रकल्पाच्या पुनर्बांधणीपूर्वी त्याच संकुलात नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या ९१० दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रकल्पामुळे ही क्षमता वाढून १८२० दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे १,६८५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.