मुंबईत पावसाचा जोर वाढणार! पुण्यात जुलैतील पाऊस विक्रम मोडणार; ठाणे, रायगड, पालघरमध्ये कोसळधारेचा इशारा

बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत ३१ जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात ३० आणि ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये गुरूवारी ३० जुलै रोजी पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे.
मुंबईत पावसाचा जोर वाढणार! पुण्यात जुलैतील पाऊस विक्रम मोडणार; ठाणे, रायगड, पालघरमध्ये कोसळधारेचा इशारा
मुंबईत पावसाचा जोर वाढणार! पुण्यात जुलैतील पाऊस विक्रम मोडणार; ठाणे, रायगड, पालघरमध्ये कोसळधारेचा इशाराप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत ३१ जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात ३० आणि ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये गुरूवारी ३० जुलै रोजी पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. हिंगोली, धाराशिव,नांदेड, लातूर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भात संततधार सुरूच असली तरी पावसाची तूट कायम असताना पुण्यातील पाऊस जुलैमधील विक्रम मोडेल असा अंदाज आहे.या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर, विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेशात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता

अतिवृष्टीसदृश पावसाची शक्यता असल्याने या काळात सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होणे, तसेच काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी दरड कोसळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. सध्याच्या हवामान अंदाजानुसार, कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्याने विदर्भात, विशेषतः पूर्व विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे. ३० जुलै रोजी त्याचा प्रभाव पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकणात अधिक जाणवू शकतो.

नागपूरमध्ये मुसळधार

शहरात मंगळवारी दुपारी अवघ्या काही तासांत झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली. ठिकठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचल्याने अनेक नागरिक अडकले, तर दुचाकी आणि चारचाकी वाहने पाण्यात बुडाली. काही शाळांमध्ये पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांना दोरखंडांच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढावे लागले. स्वावलंबीनगर भागात तर अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बोटीचा वापर केला.शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा फटका नागरिकांना बसला. खोदकामे, अपूर्ण रस्ते आणि तुंबलेल्या नाल्यांमुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

पुण्यात पावसाची जोरदार हजेरी

पावसाने पुण्यात यंदा जूनमध्ये ओढ दिल्याने महिन्याची सरासरी देखील गाठता आली नव्हती; पण जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली आणि दहा दिवसांतच महिनाभराची सरासरी ओलांडली. त्यानंतर पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती; पण गेल्या आठवड्यापासून पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. पुणे शहरात एक जून ते २८ जुलै या कालावधीत ५७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहराबरोबरच जिल्हा आणि घाटमाथ्यावरही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in