व्हिक्टोरिया गाडी; तिची बातच न्यारी!

विना घोड्यांच्या गाडीला लहानांपासून थोरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबई दर्शनसह मरीन ड्राईव्ह फेरफटक्यासाठी ६ गाड्या कार्यरत
व्हिक्टोरिया गाडी; तिची बातच न्यारी!

घोडागाडी म्हटले की लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचेच आकर्षण. घोड्यांच्या टापांचा आवाज, झोकात धावणारा घोडा आणि ती सफर एक वेगळीच असायची. मात्र बघता बघता मुंबईतील लोकसंख्या आणि त्या बरोबरीने रस्त्यावरील वाहनांची गर्दी वाढू लागली. पुढे घोड्यांच्या तबेल्याचे नियम पाळले जात नसल्याने मुंबई महानगरपालिकेने १९७४मध्ये घोड्यांच्या तबेल्यांना परवाने देणे बंद केले. त्यानंतर हळूहळू त्या काळात धावणारी व्हिक्टोरिया गाडी नामशेष होऊ लागली. मात्र त्या गाड्यांची क्रेझ आजही सर्वांच्या मनात ठासून भरल्याने हीच व्हिक्टोरिया गाडी २०२१ मध्ये घोड्यांशिवाय नव्या रुपात रस्त्यावर आणण्यात आली. उबो राइडस आणि खाकी टूर्स यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिक्टोरिया सुरू करण्यात आली असून या गाड्यांची रचना जुन्या व्हिक्टोरियाप्रमाणेच आहे. या इलेक्ट्रिक गाडीला त्याच उत्साहाने मुंबईच्या रस्त्यांवर प्रतिसाद मिळत असून आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.

घोड्यांच्या टापांची तालबद्ध टपटप आणि चाकांच्या चक्राची लय सांभाळून एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर डौलात घोडागाडी धावायची. पण यासाठी घोड्यांचा केला जाणारा वापर यामुळे प्राण्यांचे शोषण होत असल्याची प्राणी प्रेमींची धारणा होती. म्हणूनच मुंबईत घोडागाडीला बंदी घालण्यात आली. त्यांनतर एक वेगळी ओळख असलेली घोडा गाडी नव्या स्वरुपात रस्त्यांवर धावत आहे. ही व्हिक्टोरिया गाडी घोड्यांशिवाय असून बॅटरीवर कार्यरत आहे. सध्या ६ गाड्या कार्यरत असून यापैकी २ गाड्या आलिशान ताज हॉटेलमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या सेवेत असून उर्वरित ४ गाड्या मुंबईकरांच्या सेवेत आहेत. दरम्यान, ही व्हिक्टोरिया आणखी काही मार्गांवर चालवण्याबाबत विचार सुरू असून वाहतूक पोलिसांशी याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती एका उबो राईड च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

व्हिक्टोरिया गाडीचे वैशिष्ट्य

- बॅटरीवर धावणाऱ्या गाडीचा वेग ताशी २० किमी प्रति तास

- गाडीमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यान्वित

- स्थळांची माहिती देण्सासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा

असे आहेत फेऱ्यांचे दर

मरीन ड्राईव्ह येथे ४ गाड्या मुंबईकरांच्या सेवेत आहेत. याठिकाणी वेळेनुसार दर आकारण्यात येत आहेत. ५०० रुपये २ हजार रुपयांपर्यंत या फेऱ्यांचे दर असून सीएसएमटी रेल्वे स्थानक, मुंबई महानगरपालिका, मंत्रालय, मुंबई उच्च न्यायालय, हुतात्मा चौक, नरिमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया आदी स्थळांचा मुंबई दर्शनमध्ये समावेश आहे. मुंबई दर्शनसाठी पर्यटकांना अर्ध्या तासासाठी २ हजार रुपये, तर १ तासासाठी ४ ते ५ हजार रुपये दर आकारण्यात येत आहेत.

‘त्या’ व्हिक्टोरिया गाडीची एक आठवण

मुंबईच्या रस्त्यांवर १८८२ मध्ये प्रवासी वाहतुकीसाठी पहिली 'व्हिक्टोरिया' आली. त्याचे श्रेय बेवर या स्थानिक माणसाला जाते. १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत टांगा (स्थानिक व इंग्रज लोकांच्या भाषेत बग्गी) हे प्रवासी वाहतुकीचे मुख्य साधन होते. मात्र याद्वारे आरामदायक प्रवास होत नसे. चार आणे प्रती मैल भाडे होते. सधन लोक, ब्रिटिश अधिकारी त्यातून प्रवास करण्यास नाखूश असत. या सर्व अडचणी, गैरसोयींचा विचार करून फ्रान्समध्ये १८६०च्या दरम्यान घोडागाडीचे एक नवीन मॉडेल बनवण्यात आले. इंग्लंडच्या प्रिन्स ऑफ वेर्ल्सने १८६९ साली नवीन रूपातली घोडागाडी फ्रान्समधून इंग्लंडला आयात केली. इंग्रज आणि फ्रेंच लोक यांचे संबंध विशेष चांगले नव्हते. फ्रेंच कारागिरांनी घोडागाडीच्या या नवीन मॉडेलचे नाव उपहासाने ‘व्हिक्टोरिया’ असे ठेवले. इंग्रजी भाषेत १८७० पर्यंत घोडागाडीसाठी व्हिक्टोरिया हा शब्द नव्हता. प्रवाशांना रस्त्यापासून फूटभर उंच असलेल्या फूटबोर्डवर (पायरीवर) पाय ठेवून सहजगत्या येत असे. समोर घोड्यांच्या दिशेने तोंड असलेली, दोन प्रवाशांसाठी, चामड्याचे आवरण असलेली, लोखंडी सीट किंवा बैठक देण्यात आली. ड्रायव्हर किंवा गाडीच्या वाहकाची सीट लोखंडी फ्रेमच्या साहाय्याने बरीच उंच करण्यात आली. त्यामुळे दुरूनही व्हिक्टोरिया दृष्टीस पडत असे. या नवीन फॅशनच्या गाडीचे व्हिक्टोरिया याच नावाने उत्स्फूर्त स्वागत झाले.

येत्या १५ दिवसात आणखी १० गाड्या धावणार

वाढत्या प्रतिसादामुळे येत्या १५ दिवसात आणखी १० व्हिक्टोरिया गाड्या रस्त्यावर धावणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी केतन कदम यांनी दिली. या नव्या १० गाड्या बोरिवली येथील गोराई विलेज परिसर, वांद्रे येथील बँड स्टँड, कार्टर रोड, चेंबूर येथील डायमंड गार्डन तसेच माटुंगा येथे चालवण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

"खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. परदेशी पर्यटक आणि मुंबईकरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. लवकरच १० गाड्या आपण सुरू करत असून त्यासंबंधित सर्व आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत."

- केतन कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी, ऊबो राईड

logo
marathi.freepressjournal.in