

मुंबई : मुंबई शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी आणि शाश्वत शहरी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील गर्दीच्या सेंट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्टसमध्ये वाहतूक कोंडी कर लागू करण्याची मागणी नवनियुक्त भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे.
हा कर आगामी पालिकेच्या अर्थसंकल्पात लागू करावा, असेही नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी म्हटले आहे. लंडन आणि सिंगापूरच्या धर्तीवर याठिकाणी अंमलबजावणी करण्यात यावी, असे पत्रात नमूद केले आहे.
उच्च वाहतूक असलेल्या भागांमध्ये एकट्या प्रवाशासह येणाऱ्या खासगी वाहनांवर कर आकारावा, शहरातील वाहतूक कोंडी असलेले भाग ओळखून त्या ठिकाणी हा कर लागू करण्याबाबत चर्चा करून गर्दीच्या भागात प्रवेश करणाऱ्या वाहनांकडून शुल्क आकारावे, अशी मागणी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. या उपक्रमासाठी पालिकेने पुढाकार घेऊन या कराच्या वसुलीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, तपासणी केंद्रांवर फास्टॅगद्वारे स्वयंचलित शुल्क वसुलीची सुविधा असावी, आगामी अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करून पायलट प्रकल्प म्हणून राबवता येईल, असेही मकरंद नार्वेकर म्हणाले. आर्थिक सर्वेक्षण अहवालात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, प्रदूषण घटवण्यासाठी आणि गतिशीलता सुधारण्यासाठी कोंडी शुल्काची शिफारस करण्यात आली आहे.
वर्षाला ३०० कोटी महसूल प्राप्त होईल!
गर्दीच्या वेळेत प्रति प्रवेश ५० ते १०० रुपये इतका कर आकारता येईल. उच्च वाहतूक क्षेत्रे सध्याच्या सीसीटीव्ही आणि एएनपीआर (स्वयंचलित क्रमांक प्लेट ओळख प्रणाली) कॅमेऱ्यांच्या मदतीने निश्चित करता येतील. या उपक्रमातून दरवर्षी अंदाजे २०० ते ३०० कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो, जो शहराच्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरता येईल, असा विश्वासही मकरंद नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.