
पूनम अप्राज / मुंबई
मंगळवारी मुंबईच्या रस्त्यांवर अक्षरशः हाहाकार उडाला. कोणतीही ठोस पूर्वतयारी न करता एलफिन्स्टन पूल पाडण्यात आला, टिळक पुलाचे रूंदीकरण अद्याप अपूर्ण, सायन-धारावी पुलाचे काम थांबलेले, मंत्रालयासमोर जलवाहिनी दुरुस्ती, आणि त्यात भर म्हणून नवरात्रीची खरेदी - या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन दक्षिण मुंबईत सर्वत्र वाहतूक कोंडी निर्माण झाली.
हाजी अली, वॉर्डन रोड, पेडर रोड, गामदेवी रोड आणि पुढे संपूर्ण परिसरात, महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या हजारो भाविकांमुळे इतकी गर्दी झाली की गाड्या अक्षरशः इंचभर सरकत होत्या. याशिवाय, पश्चिम उपनगरातील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील नेहमीचा वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे तो वेगळाच.
टॅक्सीचालक रमानंद मिश्रा म्हणाले, “मी गेली २० वर्षं टॅक्सी चालवतोय, पण इतकी भीषण वाहतूक कधीच अनुभवली नव्हती. आता टॅक्सी घेऊन रस्त्यावर पडायची भीती वाटते.” दुसरे चालक विश्वास माने म्हणाले, “या कोंडीत आम्ही तासन्तास अडकतो, धुरामुळे डोके दुखते.”
अदित्य कामत, एक वाहनचालक, यांनी सांगितले की ते सकाळी ९ वाजता सायन येथून लोअर परळला जात असताना करी रोड पुलावर प्रचंड वाहतूक कोंडीत अडकले होते.
नागरिकांचा आरोप आहे की पर्यायी व्यवस्था न करता एल्फिन्स्टन पूल तोडणे ही प्रशासनाची मोठी चूक आहे.
मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवाल्यांना हटवण्याचे आदेश दिले होते, पण प्रशासनाने ते अमलात आणलेले नाहीत. त्यामुळे दादरमधील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. योग्य आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन उपाययोजनांचा अभाव यामुळे ॲम्ब्युलन्स आणि अग्निशमन सेवा धोक्यात आली आहेत.
त्याचप्रमाणे, एल्फिन्स्टन पूल बंद असल्याने करी रोड, लोअर परळ, सायन, लालबाग या पुलांवरही सकाळच्या ऑफिस वेळेत आणि रात्री उशिरा प्रचंड वाहतूक पाहायला मिळाली. अनेक कारचालक तासन्तास रस्त्यावर अडकले, आणि मुंबईतील प्रवाशांचा दिवस अजूनच त्रासदायक ठरला.
मुंबईतील इतर भागांनाही फटका
मंगळवारी सकाळी पश्चिम उपनगरांमध्येही प्रचंड वाहतूक कोंडी झाली. गोरगाव-मुलुंड लिंक रोडच्या जोड बोगद्याच्या (ट्विन टनेल) खोदकामासाठी दिंडोशीला आणलेली टनेल बोरिंग मशीन यामुळे सकाळी वाहतूक ठप्प झाली, असे संयुक्त पोलिस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी सांगितले.
एलफिन्स्टन पूल बंद; दादरला वाहतूक विस्कळीत
टिळक पूलाचे रूंदीकरण पूर्ण होण्याआधीच एल्फिन्स्टन पूल पाडण्यात आल्यामुळे दादरमधील वाहतूक अधिकच बिघडली आहे. यामुळे दादर स्थानक ते माटुंगा आणि माहिमपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. सध्या सणासुदीचा काळ सुरू असल्याने व्यापारी वर्गामध्येही चिंता वाढली आहे. टिळक पूलाचे काम मागील ८ महिन्यांपासून प्रलंबित असून, दादरमधील नागरिक आणि व्यापारी यामुळे प्रचंड संतप्त आहेत. “पहिले काम पूर्ण करा, मगच पुल पाडा,” अशी त्यांची भूमिका आहे. पण प्रशासनाने घाईत एलफिन्स्टन पूल बंद करून मुंबईतील सगळ्यात गजबजलेल्या भागात गोंधळ माजवला आहे.
नागरिकांच्या मागण्या
दादर, प्रभादेवी, शिवाजी पार्क, शितलादेवी मंदिर, माहीम येथील स्थानिक रहिवाशांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले असून, वाहतूक व्यवस्थापन सुधारण्याची मागणी केली आहे. तसेच...
वाहतूक पोलीस अधिक संख्येने तैनात करावेत
रस्त्यावरील व फूटपाथवरील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई करावी
प्रमुख रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग हटवावी
दादर व्यापारी संघटनेचे सचिव दीपक देवरुखकर म्हणाले, “ टिळक पुलाचे काम वेळेत पूर्ण करणे आणि वाहतूक मोकळी करण्यासाठी तातडीची पावले उचलणे ह्याच आमच्या मुख्य मागण्या आहेत.”
आपत्कालीन सेवा अडचणीत
स्थिती इतकी बिघडली आहे की ऍम्ब्युलन्स व अग्निशमन दलाच्या गाड्याही तासन्तास वाहतुकीत अडकत आहेत. त्यातच गणेशोत्सव नुकताच संपला असून नवरात्रीच्या सणासाठी बाजारात मोठी गर्दी झाल्याने परिस्थिती अधिकच बिघडली आहे.