ट्रॅफिकनामा! पश्चिम द्रुतगती महामार्गावर चक्काजाम; २७ किलोमीटर अंतरासाठी लागतात अडीच तास

मेट्रोचे काम, उड्डाणपुल उभारणी यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी आता नित्याचा भाग बनली आहे.
ट्रॅफिकनामा! पश्चिम द्रुतगती महामार्गावर चक्काजाम; २७ किलोमीटर अंतरासाठी लागतात अडीच तास
Published on

मुंबई : मेट्रोचे काम, उड्डाणपुल उभारणी यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी आता नित्याचा भाग बनली आहे. सकाळी आणि सायंकाळी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने महामार्गावर चक्काजाम होत आहे. माहीम चर्च ते दहिसर नाका हे अंतर पूर्ण करण्यासाठी दोन ते अडीच तासांचा वेळ लागत आहे. प्रदूषण आणि इंधनाच्या वाढत्या खर्चाने या मार्गाने प्रवास करणारे लाखो प्रवासी हैराण झाले आहेत.

मुंबईकर कामानिमित दक्षिण मुंबईत सकाळी मोठ्या संख्येने येतात. कार्यालयीन वेळेनंतर पुन्हा घराकडे प्रयाण करतात. सायंकाळी वाहने चर्चगेट, कफ परेड, नरीमन पाइंट येथून थेट कोस्टल रोड, वांद्रे वरळी सी लिंकवर २० किलो मीटर अंतर अर्धा तासात पूर्ण करतात. टोल नाकाहून पुढे आल्यानंतर वांद्रे रिक्लेमेशनपासून वाहतूक कोंडीला सुरुवात होते. ते डोमेस्टिक एअरपोर्टपर्यंत ट्राफिक असते. त्यापुढे अंधेरी पूर्व ते आरेपर्यंत पुन्हा वाहतूक मांदावते. मालाड आणि दहिसर या परिसरात ट्राफिक असल्याने टोल नाका येण्यास २ तास लागतात असे, वाहन चालक आकाश गुप्ता यांनी संगितले.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्प राबविण्यात आल्याने महामार्गाच्या मार्गिका कमी झाल्या आहेत. वांद्रे पुलावर मेट्रो २ ब चे काम अद्यापही सुरू आहे. त्यालगतच बिकेसीकडे जाण्यासाठी ब्रिज उभारण्यात आला आहे. या ठिकाणी दोन्ही दिशेकडील मार्गावर इतर ठिकाणाहून आलेले रस्ते जोडण्यात आले आहेत. त्यामुळे माहीम - वांद्रे रेल्वे रुळावरील पुलापासून दोन्ही दिशेला वाहतूक कोंडी होते. दहिसरच्या दिशेने जाणारी वाहने वांद्रे टीचर्स कॉलनीजवळील उड्डाणपूलावरुन जाण्यासाठी मार्गिकेचे पालन करत नाहीत. त्यामुळे टीचर्स कॉलनी ते वांद्रे रिक्लेमेशन उड्डाणपूलावर वाहतूक कोंडी होते, असे एका वाहतूक पोलिसाने सांगितले.

कुर्ला सांताक्रूझ लिंक रोडचे काम सुरू असून उड्डाणपूलाच्या दोन मार्गिका पानबाई शाळेजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर उतरविण्यात आल्या आहेत.

सकाळी ८.३० ते ११ वाजेपर्यंत

- वांद्रे ते दहिसर चेक नाका अंतर पार करण्यासाठी १ तास लागतो.

- दहिसर चेक नाका ते वांद्रे अंतर पार करण्यासाठी २ तास लागतात.

सायंकाळी ते रात्री ९.३० पर्यंत

- वांद्रे ते दहिसर चेक नाका अंतर पार करण्यासाठी २ ते अडीच तास लागतात.

- दहिसर चेक नाका ते वांद्रे अंतर पार करण्यासाठी ४५ मिनिट लागतात.

मुंबईत वाहनांची संख्या वाढत आहे. सध्या २४ लाख वाहने रस्त्यावर आहेत. पार्किंग सुविधा नसल्याने अनेक ठिकाणी वाहने रस्त्यावर उभी करण्यात येत आहेत. दुतर्फा वाहने उभी करण्यात येत असल्याने वाहनांना अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. कितीही मेट्रो सेवेत आल्या तरी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्याएवजी आणखी वाढणार आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. - अशोक दातार, वाहतूक तज्ज्ञ.

logo
marathi.freepressjournal.in