ब्लॉकमुळे मुंबईकरांचे 'मेगा हाल'; मध्य रेल्वेवरील ब्लॉकचा वेळ वाढल्याने प्रवाशांची दैना

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते मस्जिद बंदर स्थानकादरम्यान असलेल्या कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त शनिवारी रात्री ते रविवारी (ता.२६) सकाळी ५.३० वाजेपर्यंत सहा तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते मस्जिद बंदर स्थानकादरम्यान असलेल्या कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त शनिवारी रात्री ते रविवारी (ता.२६) सकाळी ५.३० वाजेपर्यंत सहा तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. या कालावधीत सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा स्थानकांदरम्यान वाहतूक बंद ठेवली होती. मात्र नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्याने ब्लॉक सकाळी १० वाजून ९ मिनिटांनी रद्द करण्यात आला. यामुळे लोकल सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद स्थानकादरम्यान कर्नाक उड्डाणपुलाचा दुसरा स्पॅन उभारणीच्या कामासाठी मध्य रेल्वेने विशेष ब्लॉक घेतला आहे. २५ आणि २६ जानेवारी ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीच्या मध्यरात्री ५ विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. उड्डाणपुलाचा दुसऱ्या स्पॅनच्या कामासाठी शनिवार (ता.२५) रात्री ११.३० ते पहाटे ५.३० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा आणि वडाळा या स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात आला. मात्र गर्डर टाकण्याच्या कामावेळी एक कामगार जखमी झाला. तसेच इतर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ब्लॉकचा वेळ वाढला. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली. लोकल कुर्ला आणि परळ स्थानकापर्यंतच धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. सीएसएमटीच्या दिशेने निघालेले प्रवासी मधेच अडकून पडले.

ब्लॉक वाढल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक बिघडले. वाहतूक सेवा नियोजित वेळापत्रकापेक्षा एक तास उशीराने सुरु होती. इच्छित स्थळी जाण्यास लोकल नसल्याने प्रवाशांनी रुळामधून चालत जवळचे स्थानक गाठले. लोकल मुख्य मार्गावरील लोकल भायखळा, दादर, परळ स्थानकापर्यंत चालविण्यात येत होती. तर हार्बर मार्गावरील लोकल वडाळा स्थानकापर्यंत चालविण्यात येत होती. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अखेर सर्व मार्गावरील ब्लॉक सकाळी १० वाजून ९ मिनिटांनी हटविण्यात आला. मात्र कर्नाक पूलाजवळ लोकलची वेग मर्याद ताशी ३० किमी वेगाने ठेवण्यात आली. यामुळेही लोकल धीम्या गतीने सुरू असल्याने प्रवाशांची कोंडी झाली. हा ब्लॉक आणखी काही दिवस असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

दादर स्टेशन परिसरात लोकल ट्रेनच्या रांगा लागल्याने चाकरमान्यांची कामावर जाण्यासाठी कसरत सुरू आहे. अनेक जण लोकलमधून उतरून रेल्वे ट्रॅक वरून चालत स्थानक गाठत असल्याचे चित्र दिसत आहे.

कर्नाक बंदर पुलावर गर्डर टाकायला सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. हा ब्लॉक सकाळी ५.३० वाजता संपणार होता. मात्र त्याला विलंब झाला, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्नाक बंदर पुलाचा गर्डर टाकताना एका कामगाराला दुखापत झाल्याचीही माहिती आहे, असे एक अधिकाऱ्यांनी सांगितले.

या ब्लॉकमुळे स्थानिक तसेच लांब पल्ल्याच्या ट्रेन्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणी येत आहेत. प्रवाशांसाठी सीएसएमटी, दादर, भायखळा आणि वडाळा रोड येथे बस व्यवस्था केली गेली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

श्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवाही उशीराने सुरू आहे. चर्चगेटसाठी गाडी नसल्याने अंधेरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणारी ट्रेन अंधेरी रेल्वे स्थानकापर्यंतच धावत आहे. आज सकाळपासून मेगाब्लॉकमुळे चर्चगेटकडे जाणाऱ्या सर्व गाड्या अंधेरीपर्यंत धावत आहेत. अंधेरी स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असून प्रवासी चिंतेत आहे. गर्डर बसवण्याचं काम पूर्ण न झाल्याने तिनीही रेल्वेच्या मार्गावर रेल्वे उशिराने धावत आहेत.

शासकीय कर्मचाऱ्यांना उशीर

या ब्लाॅकमुळे रेल्वे उशीरा धावत असल्याने कामावर निघालेल्या लोकांना अथवा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनासाठी जाणाऱ्या शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना इच्छित ठिकाणी पोहोचायला उशीर झाला. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा मनस्ताप वाढला.

logo
marathi.freepressjournal.in