मुंबई : मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांनी गुरुवारी अचानक केलेल्या संपामुळे झालेल्या दोन प्रवाशांच्या मृत्यूच्या घटनेवर न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी मुंबईतील एका वकिलाने बॉम्बे हायकोर्टाला पत्र लिहून केली आहे. ही घटना ‘यंत्रणेचा गंभीर गैरवापर’ आणि ‘घटनात्मक अपयश’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मध्य रेल्वेतून दैनंदिन प्रवास करणारे अॅड. अटलबिहारी दुबे यांनी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांना पत्र याचिका पाठवून ‘निर्दोष नागरिकांचा मृत्यू टाळता आला असता’ असे सांगून न्यायालयाने ‘स्यू मोटो’ करून लक्ष द्यावे, अशी विनंती केली आहे. त्यांनी मध्य रेल्वे, रेल्वे मंत्रालय, रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि महाराष्ट्र शासनाला नोटीस बजावून घटनाक्रम, सुरक्षितता उपाययोजना आणि पीडित कुटुंबांना दिलेल्या मदतीचा तपशील सादर करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.
९ जूनच्या मुंब्रा अपघातातील निष्काळजीपणाच्या आरोपावरून जीआरपीने १ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी ६ नोव्हेंबर रोजी अचानक संप सुरू केला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे जवळपास तासभर गाड्या थांबवल्याने गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला.
लोकल ठप्प झाल्याने प्रवासी ट्रेन आणि फलाटावर अडकले. काही प्रवासी सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ रुळांवरून चालत निघाले. तेव्हा पाच प्रवाशांना लोकलने धडक दिली. यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले. ‘गर्दीच्या काळात अत्यावश्यक सार्वजनिक सेवा अचानक बंद ठेवणे हे प्रवाशांच्या घटनात्मक हक्कांवर, विशेषतः कलम २१ अंतर्गत जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारावर, थेट आघात करणारे आहे,’ असे दुबे यांनी पत्रात म्हटले आहे.