

मुंबई : आठ वर्षांनंतर मुंबईत नेमकी किती झाडे आहेत, विकासकामांमुळे किती झाडे कमी झाली, झाडांचे पुनर्रोपण केल्याने संख्या वाढली का याची इत्यंभूत माहिती मुंबईकरांना मिळणार आहे. विशेष म्हणजे मुंबईतील वृक्षांची शास्त्रीय नोंद घेण्यात येणार आहे. 'सार आयटी संशोधन' या खासगी कंपनीच्यावतीने मुंबईतील झाडांची गणना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पुढील दोन वर्षांत याचा अहवाल प्राप्त होणे अपेक्षित आहे.
मुंबईचा विकास झपाट्याने होत असून पायाभूत प्रकल्प राबवण्यात येत आहेत. विकासकामांत अडथळा ठरणारी झाडांची कापणी करण्यात येते आणि दुसरीकडे पुनर्रोपण करण्यात येते. मुंबईत सद्यःस्थितीत २९ लाख ७५ झाडे आहेत. मुंबईत दर पाच वर्षांनी झाडांची गणना होणे अपेक्षित असते. मात्र, आता ८ वर्षांनंतर वृक्षगणना होत आहे. वृक्षगणनेत जास्तीत जास्त वृक्षप्रेमी, पर्यावरणतज्ज्ञ, वनस्पती शास्त्रातील विद्यार्थी, उद्यान विभागातील अधिकारी तसेच याबाबत आवड असलेल्या महापालिकेच्या अन्य विभागातील अधिकारी यांचा समावेश करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेमार्फत वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान येथे प्रशिक्षण सेमिनार आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात वृक्षप्रेमी, पर्यावरण तज्ज्ञ, विद्यार्थी यांनी उपस्थिती नोंदवली होती. याशिवाय विविध कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना, पर्यावरण तज्ज्ञांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे.
आपल्या सोसायटीमध्ये येणाऱ्या प्रगणकांना वृक्षगणनेसाठी आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.
प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
राम निरंजन झुनझुनवाला कॉलेज या ठिकाणीही प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी वनस्पती शास्त्रातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. वृक्षांची शास्त्रीय गणना तसेच अन्य गोष्टी म्हणजे वृक्षांची प्रजाती, वृक्षांचे वय, वृक्षांचे आरोग्य याबाबत तसेच यासाठी वापरली जाणारी आधुनिक उपकरणे, मोबाईल अॅप इत्यादी माहितीचे या शिबिरात प्रशिक्षण देण्यात आले.