

मुंबई : पावसाळ्यात धोकादायक झाडे व फाद्या कोसळून दुर्घटना घडू नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवरील व रेल्वे हद्दीतील धोकादायक फांद्यांची छाटणीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. ४६ हजार ३३६ धोकादायक झाडांची छाटणी करण्यात येणार असून आतापर्यंत १२ हजार ५६१ झाडांची छाटणी करण्यात आली आहे, तर उर्वरित ३३ हजार ७७५ धोकादायक झाडांची छाटणी ३१ मे पर्यंत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. नालेसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू असून रस्त्यांच्या दुतर्फा व रेल्वे हद्दीत असलेली धोकादायक झाडे व फांद्यांची छाटणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रविवारी मुंबईत ठिकठिकाणी धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली तर रेल्वे हद्दीत हार्बर मार्गावरील चुनाभट्टी व जीटीबीनगर रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. पावसाळ्यात, वादळ वाऱ्यात, रेल्वे ट्रॅक शेजारील वृक्ष उन्मळून पडणे, फांद्या तुटणे यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होतो तसेच रुळांवर झाड पडले तर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यासोबत उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर रविवारी चुनाभट्टी व जीटीबी नगर रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. ३१ मे पर्यंत रेल्वे व रस्त्यांवरील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत असल्याचे परदेशी यांनी सांगितले.
अशी होतेय छाटणी
धोकादायक झाडे - ३२५
फांद्यांची छाटणी : २७९
फांद्यांची छाटणी करणे बाकी - ४६
पावसाळ्यापूर्वी छाटणी
एकूण झाडे - ४६,३३६
फांद्यांची छाटणी - १२,५६१
फांद्यांची छाटणी करणे बाकी - ३३,७७५