

मुंबई : आरे कॉलनीतील गौतम नगर, मॉडर्न बेकरी जंक्शन परिसरात दोन अल्पवयीन मुलांचा पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ११.५५ वाजता ही घटना उघड झाली. झैब पटेल (१५) आणि नखीब खान (१३) अशी मृत मुलांची नावे आहेत.
गौतम नगर परिसरात एका गोठ्यातील पाण्याच्या टाकीत ही दोन मुले पोहण्यासाठी उतरली होती. मात्र, पोहताना दोघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलांना पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले. त्यांना तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दोन्ही मुलांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. झैब हा दहावीच्या, तर नखीब हा नववीच्या वर्गात शिकत होता. दोघेही जोगेश्वरी गुंफा इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूलचे विद्यार्थी होते. घटनेच्या दिवशी दोघेही शाळेत गैरहजर होते.
या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि महापालिकेच्या विभागीय कर्मचाऱ्यांनी मदतकार्य केले.