

मुंबई : मुंबईतील दहिसर उपनगरात शनिवारी सकाळी एका पाण्याने भरलेल्या खदानीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही घटना सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत येणाऱ्या केतकी पाडा येथील 'शेख खदान' परिसरात घडली.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरुण १० ते १५ फूट खोल खदानीत पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांनाही पाण्यातून बाहेर काढून तातडीने पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पियूष गुप्ता (१९) आणि ओम अंकुश सिंग (१९) अशी मृत तरुणांची नावे आहेत. या घटनेची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर घटनेचे मुख्य कारण स्पष्ट होईल, असे मुंबई महापालिकेच्या आर नार्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त रोहित त्रिवेदी यांनी सांगितले.
दहिसर पूर्व केतकी पाडा नॅशनल पार्कमध्ये धबधब्याच्या ठिकाणी दोन तरुण शनिवारी सकाळी पोहोचण्यासाठी गेले. मात्र तोल गेल्याने दोघेही १० ते १५ फूट खोल पाण्यात पडले. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. अखेर अग्निशमन दलाने दोन्ही तरुणांना पाण्याबाहेर काढून तातडीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी दोघांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.