
मुंबई : भारतीय विद्यापीठ संघाच्या वतीने (एआययू) आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सवात मुंबई विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रात सुवर्ण कामगिरी केली आहे. मूलभूत शास्त्रे आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास गटात प्रथम क्रमांक पटकावून दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. चित्कारा विद्यापीठ पंजाब येथे १० आणि ११ मार्च २०२५ या दोन दिवसांत या संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
देशभरातील ८२ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील १२ विद्यापीठांचे संशोधन प्रकल्प या संशोधन महोत्सवात निवडले गेले होते. मूलभूत शास्त्रे गटात अक्षय परब आणि वैभव कदम यांनी ‘प्लाजमा एनरहान्स लेझर एब्लेशन सिस्टम फॉर थर्ड- नायट्राईड ग्रोथ एट लो टेम्परेचर’ हा प्रकल्प सादर केला. तर आंतरविद्याशाखीय संशोधन गटात तनिषा गौर, यथार्थ वझीर, अक्षित सावलिया आणि यशकुमार दुबे यांनी ‘इशारा- अ गेश्चर ऑफ कम्युनिकेशन’ हा प्रकल्प सादर केला. या दोन्ही प्रकल्पांनी स्पर्धेत प्रथम स्थान पटकावले.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांमधील नवकल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन ओळखून त्यांना संधीची उपलब्धता करून देणे, विद्यार्थ्यांसह शिक्षकांमधील संशोधनवृत्तीला बळ देऊन राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अधिकाधिक सहभागिता वाढविणे अशा महत्वाकांक्षी उद्देश्यांसह विद्यार्थी संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
पश्चिम विभागीय क्षेत्रातून मुंबई विद्यापीठाचे चार प्रकल्प सादरीकरणासाठी पात्र ठरले होते. त्यातील दोन मूलभूत शास्त्रे आणि आंतरविद्याशाखीय संशोधन गटात विद्यापीठास मोठे यश मिळाले.
“राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या संशोधन महोत्सवात मुंबई विद्यापीठाच्या चमूने केलेल्या सुवर्ण कामगिरीमुळे मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आविष्कार आणि अन्वेषण संशोधन महोत्सवातून पुढे येणाऱ्या प्रतिभावंताच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी, मदत व अर्थसहाय्य करण्यासाठी विद्यापीठाने पाऊले उचलले असून इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या या प्रकल्पांना मूर्त रूप दिले जात आहे.”
- प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ