

मुंबई : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेने विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत ‘ॲप्रेंटिसशिप एम्बेडेड बी.ई. पदवी अभ्यासक्रम’ (एईडीपी) राबविण्याचा अभिनव निर्णय घेतला आहे. यामुळे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना थेट उद्योगात प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
या अभिनव अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या पदवीसोबतच उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार असून, शैक्षणिक ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य यांची सांगड घातली जाणार आहे. अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात शिकविले जाणारे तांत्रिक ज्ञान विद्यार्थी प्रत्यक्ष उद्योगातील प्रकल्प, प्रक्रिया आणि कामकाजामध्ये वापरू शकणार आहेत.
सैद्धांतिक शिक्षण आणि प्रत्यक्ष कामातील दरी कमी होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगातील कार्यपद्धती, गुणवत्ता मानके आणि व्यावसायिक शिस्त यांचा प्रत्यक्ष परिचय विद्यार्थ्यांना होईल.
यासोबतच तांत्रिक कौशल्यांबरोबरच संवादकौशल्य, टीमवर्क, समस्या सोडविण्याची क्षमता, निर्णयक्षमता आणि वेळेचे व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वपूर्ण व्यावसायिक कौशल्यांचा विकास होणार आहे. उद्योगातील अनुभवी मार्गदर्शकांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाच्या आव्हानांचा सामना करण्याचा आणि त्यातून शिकण्याचा अनुभव मिळेल.एईडीपीमुळे निर्माण होणारे उद्योगातील व्यावसायिक संपर्क आणि प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करिअरसाठी उपयुक्त ठरणार आहेत.
४२ क्रेडिट्स मिळणार
एईडीपी अंतर्गत बी.ई.च्या अंतिम वर्षातील जास्तीत जास्त १५ टक्के विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. पाचव्या सत्रात किमान ६.७५ सीजीपीईए असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. अधिक सीजीपीआय असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. मात्र ऑनर्स, मायनर किंवा ऑनर्स विथ रिसर्च निवडलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही. विद्यार्थ्यांना सातवे आणि आठवे सत्र मिळून एक वर्षाची अप्रेंटिसशिप पूर्ण करावी लागेल. या कालावधीत किमान १,२६० तासांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेणे आवश्यक असून त्यासाठी एकूण ४२ क्रेडिट्स देण्यात येतील.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील अनुभवाधारित, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षणाच्या उद्दिष्टांना या उपक्रमामुळे प्रभावी चालना मिळेल. उद्योगाच्या गरजा आणि शैक्षणिक संस्थांचे ज्ञान यांची सांगड घालून भविष्यासाठी सक्षम अभियंते घडविणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ