

मुंबई : बदलत्या जागतिक शैक्षणिक प्रवाहांशी सुसंगत, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि कौशल्य आधारित शिक्षणाच्या उद्दिष्टांना बळ देणारा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ च्या बृहत आराखड्यात विद्यापीठाच्या परिक्षेत्रात १२ बहुविद्याशाखीय कौशल्याधारित महाविद्यालये स्थापन करण्यासाठीचा बृहत आराखडा बुधवारी सिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला.
मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या सहा जिल्ह्यांमध्ये उच्च शिक्षणाच्या बदलत्या गरजा, स्थानिक उद्योग, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन ही महाविद्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत. अलीकडील काळात अनेक पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमधील प्रवेशसंख्येत घट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर केवळ पारंपरिक शिक्षणावर भर न देता उद्योगविश्वाच्या अपेक्षा पूर्ण करणारे, कौशल्यविकासाला चालना देणारे आणि रोजगारक्षमतेत वाढ करणारे अभ्यासक्रम विकसित करण्याचा महत्वूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच उद्योग, सेवा, संशोधन आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध होतील.
पारंपारिक अभ्यासक्रमांची पूर्णतः रचना बदलून त्यास कौशल्य आणि उद्योजकतेची जोड देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना बीए इतिहासमध्ये डिजिटल इतिहास व अभिलेख व्यवस्थापन, सार्वजनिक इतिहास व वारसा पर्यटन, इतिहासाचे जागतिक परिप्रेक्ष्य, सांस्कृतिक संसाधन व्यवस्थापन, वारसा संवर्धन व पुनर्स्थापना, ऐतिहासिक संशोधनातील कृत्रिम बुद्धिमत्ता, वारसा क्षेत्रातील उद्योजकता तसेच बीए राज्यशास्त्र अभ्यासक्रमांत डिजिटल अॅडव्होकेसी आणि कॅम्पेनिंग, राजकीय विश्लेषणातील कृत्रिम बुद्धिमत्ता, वाटाघाटी व राजनय कौशल्ये, राजकारणातील नेतृत्व व व्यवस्थापन, माध्यमे आणि राजकीय संवाद, राजकीय जोखीम विश्लेषण व पूर्वानुमान, धोरण समर्थन व लॉबिंग, राजकीय मानसशास्त्र व वर्तन विश्लेषण इत्यादी आधुनिक, बहुविद्याशाखीय आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम प्रस्तावित करण्यात आले आहेत.
या अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना या वैविध्यपूर्ण क्षेत्रांमध्ये आवश्यक व्यावसायिक व रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
प्रस्तावित महाविद्यालयांचे बिंदू
मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रात प्रस्तावित करण्यात आलेली ही नवीन महाविद्यालये मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील दादर पश्चिम-१, दक्षिण मुंबई-१, मालाड पश्चिम-१, मुलुंड पूर्व-१, कांदिवली पूर्व-१; ठाणे जिल्ह्यात मुरबाड सरळगाव-१; रायगड जिल्ह्यातील रोहा-१; रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी चाफे-१, दापोली सिटी-१; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे-१ आणि पालघर जिल्ह्यातील लालोंडे-१ आणि वसई कामण येथे -१ असे एकूण १२ बहुविद्याशाखीय कौशल्यविकासाधारित महाविद्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत.