
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २० ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी किमान पात्रता धारकांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.
दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात पहिल्यांदाच पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबवली जात आहे.
पदवी स्तरावरील बीएमध्ये (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल, ग्रामीण विकास, मराठी, हिंदी आणि इंग्रजी) या विषयांचा समावेश आहे. बीकॉम (कॉमर्स, अकाऊंटंसी, आणि बिझनेस मॅनेजमेंट), बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान), बीएस्सी (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
तर पदव्युत्तर स्तरावरील एम.ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क); एम. कॉम. (ॲडव्हान्स अकाऊंटंसी), एम. कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट), एम.एस्सी. (गणित) एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एस्सी. (संगणकशास्त्र) एमएमएस, एमसीए यांचा समावेश आहे.
या संकेतस्थळांवर करता येणार अर्ज
पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील या सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया https://mucdoeadm.samarth.edu.in/ या संकेत स्थळावरून करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंबंधातील सर्व तपशील आणि माहिती पुस्तिका (प्रॉस्पेक्ट्स) विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ distance-open-learning/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.