मुंबई विद्यापीठात ‘डॉ. आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना; स्पर्धा परीक्षांसाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण होणार उपलब्ध

मुंबई विद्यापीठात ‘डॉ. आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना; स्पर्धा परीक्षांसाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण होणार उपलब्ध

मुंबई विद्यापीठाने सामाजिक समता, समावेशक प्रशासन आणि प्रशासकीय नेतृत्व विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय व पीएम केअर्स बालक योजना लाभार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन योजना या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत मुंबई विद्यापीठात ‘डॉ. आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना होणार आहे.
Published on

मुंबई : मुंबई विद्यापीठाने सामाजिक समता, समावेशक प्रशासन आणि प्रशासकीय नेतृत्व विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय व पीएम केअर्स बालक योजना लाभार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन योजना या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत मुंबई विद्यापीठात ‘डॉ. आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना होणार आहे. आज नवी दिल्ली येथे मुंबई विद्यापीठ आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

मुंबई विद्यापीठाच्यावतीने या करारावर कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्यावतीने संचालक मनोज तिवारी यांनी करारावर सह्या केल्या. यावेळी. डॉ. आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्सचे संचालक डॉ. संतोष राठोड आणि डॉ. आंबेडकर फाऊंडेशन रविकांत त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण, वंचित, मागास विद्यार्थ्यांना होणार लाभ

या केंद्राच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, बँकिंग, इन्शुअरन्स, पीसएयू, क्लॅट, जीआरई, जीमॅट, सॅट आणि आयइएलटीएस-टॉफेल अशा केंद्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, मार्गदर्शन, अध्ययनसामग्री आणि वैयक्तिक सल्ला आणि समुदेशनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही योजना अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसह पीएम केअर्स बालक योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये प्रशासकीय सेवांमध्ये प्रवेश मिळवण्याच्या संधी वृद्धींगत करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

प्रशिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण रुजवणार

या योजनेअंतर्गत स्थापन होणारे हे केंद्र अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय आणि पीएम केअर्स योजनेतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे, नियोजनबद्ध मार्गदर्शन प्रदान करणारे एक सक्षम प्रशिक्षण व्यासपीठ ठरेल. या उपक्रमाद्वारे मुंबई विद्यापीठ सामाजिक न्याय, समान संधी आणि शैक्षणिक समावेशनाचे मूल्य दृढ करत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अविष्कार शैक्षणिक क्षेत्रात साकारत आहे. हे केंद्र केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी व नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करेल.

मुंबई विद्यापीठात ‘डॉ. आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन होणे हे सामाजिक न्याय आणि समावेशक शिक्षणाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल आहे. या केंद्राच्या माध्यमातून वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळून ते प्रशासकीय व सार्वजनिक सेवांमध्ये अधिक प्रभावीपणे सहभागी होऊ शकतील. हे केंद्र स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सेवाभाव विकसित करेल. मुंबई विद्यापीठाचा हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत असून, समाजपरिवर्तनाची नवी दृष्टी घडविणारा ठरेल.

प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

logo
marathi.freepressjournal.in