

मुंबई : अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक शिक्षण न देता त्यांच्यात संशोधनाची दृष्टी, नवोन्मेषाची वृत्ती आणि चिकित्सक विचारक्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यापीठाच्या विद्या परिषदेने विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत अभियांत्रिकी मध्ये ‘ऑनर्स विथ रिसर्च’ पदवी अभ्यासक्रमाला मंजुरी दिली असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम लागू होणार आहे.
या उपक्रमामुळे बी.ई.च्या पदवीसोबत विद्यार्थ्यांना स्वतंत्र संशोधन प्रकल्पावर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. संशोधन पद्धती, शोधनिबंध लेखन, संशोधन सादरीकरण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन नियतकालिकांमध्ये प्रकाशनाचा अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन संस्था तसेच उद्योग क्षेत्रातील भविष्यातील संधींसाठी सक्षम होता येणार आहे.
नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांना पहिल्या ते पाचव्या सत्रापर्यंत कोणताही अनुशेष (बॅकलॉग) नसणे आणि पाचव्या सत्रात किमान ७.५ सीजीपीआय आवश्यक आहे. थेट द्वितीय वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी तिसरे ते पाचवे सत्र अनुशेषमुक्त असणे आणि पाचव्या सत्रात ७.५ सीजीपीआय आवश्यक असेल. सहाव्या सत्रात विद्यार्थ्यांना संशोधन प्रस्तावाची रूपरेषा सादर करावी लागेल. संबंधित अभ्यास मंडळाकडून त्याचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना संशोधनाची प्राथमिक तयारी पाचव्या सत्रापासून महाविद्यालय स्तरावर करता येणार आहे.
विद्यार्थ्यांना ‘ऑनर्स विथ रिसर्च’साठी बी.ई.च्या नियमित क्रेडिट्सव्यतिरिक्त १८ अतिरिक्त क्रेडिट्स पूर्ण करावे लागतील.
अभियांत्रिकी शिक्षण हे केवळ तांत्रिक ज्ञान आणि पदवीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची दृष्टी, नवोन्मेषाची वृत्ती आणि समस्यांकडे चिकित्सक पद्धतीने पाहण्याची क्षमता विकसित करणारे असणे आवश्यक आहे. ‘ऑनर्स विथ रिसर्च’ या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पदवीच्या शिक्षणासोबत स्वतंत्र संशोधन प्रकल्पावर काम करण्याची, संशोधन पद्धती आत्मसात करण्याची आणि शोधनिबंध प्रकाशित करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन आणि उद्योग क्षेत्रातील भविष्यातील संधींसाठी अधिक सक्षम होता येईल.
प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
पीएचडी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन
या अंतर्गत केवळ पीएचडी मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतील. एका प्राध्यापकास जास्तीत जास्त पाच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल. मान्यताप्राप्त संशोधन केंद्र किंवा पीएचडी मार्गदर्शक असलेल्या महाविद्यालयांनाच हा अभ्यासक्रम सुरू करता येणार आहे. पीएचडी केंद्र असलेल्या महाविद्यालयांना १० विद्यार्थ्यांची आधारभूत प्रवेश क्षमता आणि प्रत्येक पीएचडी मार्गदर्शकांसाठी पाच अतिरिक्त विद्यार्थ्यांची क्षमता राहील. अर्जांची संख्या उपलब्ध जागांपेक्षा अधिक असल्यास प्रवेश गुणवत्तेच्या आधारे दिला जाणार आहे. तसेच ‘ऑनर्स विथ रिसर्च’ करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी ऑनर्स किंवा एमर्जिंग मायनर करता येणार नाही. तसेच एईडीपीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना हा पर्याय उपलब्ध नसणार आहे. विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षात या अभ्यासक्रमातून माघार घेण्याची मुभा असून, नियमित अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्यांना सामान्य बी.ई. पदवी मिळेल.