

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत महत्त्वाचे शब्द इंग्रजीत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती. याबाबत विद्यार्थ्यांनी विद्यार्थी संघटनांकडे तक्रारी केल्यानंतर संघटनांनी ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर विद्यापीठाने परिपत्रक जारी करत प्रश्नपत्रिका मराठीत देण्याची सूचना केली आहे.
विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष विधी अभ्यासक्रमाच्या २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत मराठी भाषेत उत्तर लिहिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न किंवा त्यामधील महत्त्वाचे शब्द इंग्रजीत आले होते. यामुळे मराठी भाषेत उत्तर लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांची कोंडी झाली होती. या विद्यार्थ्यांनी शुद्ध मराठी भाषेत प्रश्नपत्रिका देण्याबाबत युवासेनेकडे पाठपुरावा केला होता.
मराठीची गळपेची सहन करणार नाही
युवासेना सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठ कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन परीक्षेत अनेक प्रश्न किंवा त्यामधील महत्त्वाचे शब्द इंग्रजीत असल्याने मराठी भाषेत उत्तर लिहिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची अडचण झाल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच या विद्यार्थ्यांना मराठी भाषेत प्रश्नपत्रिका देण्यात यावी अन्यथा मराठी भाषेची गळचेपी कदापी सहन करणार नाही असे ठणकावले. यावर कुलसचिव यांनी मराठी माध्यमाच्या सर्व प्रश्नपत्रिका शुद्ध मराठी भाषेतच काढण्यात याव्यात असे परिपत्रक काढण्याचे त्वरित आदेश दिले. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.