मुंबई विद्यापीठाचे आदेश धाब्यावर! फक्त ३५३ कॉलेजेसने केली 'सीडीसी'ची स्थापना; विद्यापीठाकडून गंभीर दखल

मुंबई विद्यापीठाने वेळोवेळी पाठविलेल्या परिपत्रकांना महाविद्यालयांनी केराची टोपली दाखवली आहे.
मुंबई विद्यापीठाचे आदेश धाब्यावर! फक्त ३५३ कॉलेजेसने केली 'सीडीसी'ची स्थापना; विद्यापीठाकडून गंभीर दखल
Published on

मुंबई : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये महाविद्यालय विकास समितीची (सीडीसी) स्थापना करणे अनिवार्य आहे. याबाबत मुंबई विद्यापीठाने वेळोवेळी पाठविलेल्या परिपत्रकांना महाविद्यालयांनी केराची टोपली दाखवली आहे. विद्यापीठाशी संलग्न ८९४ महाविद्यालयांपैकी केवळ ३५३ महाविद्यालयांनी सीडीसी समिती स्थापन केली आहे. उर्वरित महाविद्यालयांनी येत्या ८ दिवसात समिती स्थापन करण्याचे निर्देश मुंबई विद्यापीठाने दिले आहेत.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियन २०१६ च्या कलम ९७ अन्वये प्रत्येक संलग्न महाविद्यालये, स्वायत्त, अधिकारप्रदत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थामध्ये स्वतंत्र महाविद्यालय विकास समितीची (सीडीसी) स्थापना करणे अनिवार्य आहे. तसेच या समितीचा अहवाल विद्यापीठास ३० जून पूर्वी सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाने वेळोवेळी परिपत्रक, सूचना आणि स्मरणपत्र काढूनही अनेक महाविद्यालयांनी अजूनही त्यांच्या महाविद्यालयात महाविद्यालय विकास समितीची स्थापना केली नसल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले आहे.

या बाबीची गंभीर दखल गुरुवारी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेमध्ये घेण्यात आली. ज्या महाविद्यालयांनी अजूनही महाविद्यालय विकास समीतीची स्थापना केली नसल्यास अशा महाविद्यालयांनी तात्काळ आठ दिवसाच्या आत त्यांच्या महाविद्यालयात सीडीसी समिती स्थापन करून विद्यापीठास अहवाल सादर करावा, असा महत्वपूर्ण ठराव व्यवस्थापन परिषदेत करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या महाविद्यालयांनी समीती स्थापनेची प्रक्रिया सुरु केली असेल अशा महाविद्यालयांनी त्यांचा अहवाल विद्यापीठास सादर करावा असाही ठराव आजच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत करण्यात आला आहे. ज्या महाविद्यालयात महाविद्यालय विकास समिती स्थापन केली जाणार नाही, अशा विद्यालयांवर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमातील तरतूदींनुसार कारवाई प्रस्तावित केली जावी असाही महत्तपूर्ण ठराव आजच्या व्यवस्थापन परिषदेत करण्यात आला आहे.

महाविद्यालय विकास समितीचे महत्व

प्रत्येक संलग्नित महाविद्यालयात महाविद्यालय विकास समितीचे अनन्यसाधारण महत्व आहे. महाविद्यालयात शैक्षणिक, प्रशासकीय आणि पायाभूत सुविधांविषयक वाढ यासंबंधात महाविद्यालयाचा सर्वांगीण सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यासाठी, अभ्यासविषयक आणि अभ्यासानुवर्ती, पाठ्यत्तर कार्यक्रम यामधील अत्युच्च गुणवत्तेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टिने महाविद्यालयास सक्षम करण्यासाठी महाविद्यालय विकास समितीची स्थापना अनिवार्य आहे.

logo
marathi.freepressjournal.in