

मुंबई : मे २०२४ मध्ये पृथ्वीवर आलेल्या गॅनन्स सुपरस्टॉर्म या दोन दशकातील सर्वात शक्तिशाली सौर वादळामागील वैज्ञानिक कारण भारतातील संशोधकांनी स्पष्ट केले आहे. या संशोधनात मुंबई विद्यापीठाचे संशोधकही सहभागी असल्याने विद्यापीठाने जागतिक अवकाश संशोधनात आपला ठसा उमटविला आहे.
द अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार मे २०२४ मध्ये सूर्यावरून सलग अनेक मोठे सौर उद्रेक झाले. या उद्रेकांमुळे अवकाशात पृथ्वीच्या आकाराच्या सुमारे १०० पट, म्हणजे तब्बल १.३ दशलक्ष किमीचा प्रचंड चुंबकीय पुनर्संयोजन प्रदेश निर्माण झाला. याच प्रक्रियेमुळे सौर वादळ अधिक तीव्रतेने पृथ्वीवर पोहोचले, ज्याचा उपग्रह संचलन, संप्रेषण व्यवस्था आणि पृथ्वीच्या चुंबकीय संरक्षण कवचावर मोठा परिणाम झाला.
हा शोध भारताच्या आदित्य-एल१ मोहिम तसेच नासाच्या सहा अंतराळयानांनी मिळून गोळा केलेल्या डेटा व निरीक्षणांवर आधारित आहे. संशोधनाचे नेतृत्व इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रातील डॉ. अंकुश भास्कर आणि त्यांचे विद्यार्थी शिबितोष बिस्वास यांनी केले. या कार्यात मुंबई विद्यापीठाचे प्रा. अनिल राघव यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले असून त्यांच्या सहकार्याने पीएचडी विद्यार्थी अजय कुमार व कल्पेश घाग यांनी विश्लेषण व डेटा-अभ्यासात योगदान दिले. या सहभागामुळे जागतिक पातळीवर भारताचे स्थान अधोरेखित झाले.
अभिमानाचा क्षण
पुढील काळात वैज्ञानिक सहकार्य वाढवण्याचा मानस व्यक्त केला आहे. अवकाश विज्ञान क्षेत्रात भारतीय संशोधनाची उंच भरारी दर्शवणारा हा शोध देशासाठी आणि मुंबई विद्यापीठासाठी मैलाचा दगड ठरला असून मुंबई विद्यापीठासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, असे विद्यापीठाने म्हटले आहे.