मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित

आदित्य ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र
File Photo
File Photo

मुंबई : मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणुकीला स्थगिती मिळाल्याने त्याचे पडसाद राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांमध्ये उमटले आहेत. विरोधी पक्षांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले असून, स्थानिक आणि लोकसभा निवडणुकांप्रमाणे मुख्यमंत्री सिनेट निवडणुकीलाही घाबरल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. सिनेट निवडणुकांमध्ये आमचाच विजय निश्चित होता. शिवसैनिकांनी तशी तयारी देखील केली होती. मात्र, सरकार घाबरल्यानेच हा निर्णय घेतल्याचे ठाकरे गटाचे खा. संजय राऊत म्हणाले आहेत.

मुंबई विद्यापीठाकडून ९ ऑगस्ट रोजी सिनेट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. १० सप्टेंबरला निवडणूक आणि १३ सप्टेंबर रोजी निकाल, असा निवडणुकांचा कार्यक्रम होता. मात्र, व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. यामुळे राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटना नाराज झाल्या आहेत.

आमचा विजय शंभर टक्के निश्चित होता. मणिपूरसारखे वातावरण इथे नाही. सव्वा लाख मतदारांनी आपली नावेही नोंदविली होती. मग असे नेमके काय घडले. कार्यक्रम स्थगित का करण्यात आला, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुंबई विद्यापीठाकडूनही कोणतेही स्पष्टीकरण देण्यात येत नाही. दोन पक्ष फोडले, दोन परिवार फोडले. महाशक्ती तुमच्यासोबत असतानाही निवडणुकांना का घाबरता. लोकसभेला देखील असेच करण्याची शक्यता आहे. निवडणुका जाहीर करतील आणि मग स्थगित करतील. सिनेट तुमचे सरकार पाडणार नसून आम्हीच तुमचे सरकार पाडणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in