Mumbai University : विद्यार्थी होणार उद्योगस्नेही; अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम अंतर्गत ३१ उद्योगांशी सामंजस्य करार

Mumbai University : विद्यार्थी होणार उद्योगस्नेही; अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम अंतर्गत ३१ उद्योगांशी सामंजस्य करार

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अन्वये कौशल्याधारीत, परिणामाभिमुख आणि उद्योगाभिमुख उच्च शिक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने मुंबई विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (एईडीपी) अंतर्गत ३१ अग्रगण्य उद्योगसंस्थांशी सामंजस्य करार केले आहेत.
Published on

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अन्वये कौशल्याधारीत, परिणामाभिमुख आणि उद्योगाभिमुख उच्च शिक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने मुंबई विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (एईडीपी) अंतर्गत ३१ अग्रगण्य उद्योगसंस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. या सामंजस्य करारांद्वारे पदवी अभ्यासक्रमांमध्ये संरचित अप्रेंटिसशिप, प्रत्यक्ष ऑन-द-जॉब प्रशिक्षण, औद्योगिक प्रकल्पांमध्ये सहभाग, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि कौशल्याधारित व्यावसायिक प्रशिक्षण यांचा समावेश करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमता वाढीसोबतच उद्योगसिद्ध कौशल्य विकास, नवोपक्रम आणि अनुप्रयुक्त संशोधनाला चालना देणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पेंट आणि कोटिंग तंत्रज्ञान क्षेत्रातील कान्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड, निप्पॉन पेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, ईस्टमन केमिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, व्हॉक्सको पिग्मेंट्स अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, के-टेक (इंडिया) लिमिटेड, अ‍ॅक्वाप्रूफ कन्स्ट्रक्शन केमिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जेनिको केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि राज स्पेशालिटी अॅडिटिव्ह्ज प्रायव्हेट लिमिटेड इत्यादी नामांकित कंपन्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत तसेच लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील एसएपी ग्लोबल लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड सह इतर क्षेत्रांतील विविध उद्योगसंस्थांशीही करार करण्यात आले. हे सर्व करार मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्थेत कार्यान्वित केले जाणार आहेत. आजमितीस या संस्थेत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध कौशल्याधारीत अभ्यासक्रम राबवले जातात.

गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण मिळणार

उद्योग आणि शिक्षण संस्थांमधील सहकार्य अधिक बळकट करून विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासोबतच प्रत्यक्ष उद्योगाधारित अनुभव आणि कौशल्ये आत्मसात करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी या कराराचे महत्त्व अधोरेखित होणार असल्याचे संस्थेचे संचालक प्रा. केयुर कुमार नायक यांनी सांगितले. या उपक्रमामुळे विविध शाखांतील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, करीअर संधी आणि कार्यबल सज्जतेत लक्षणीय वाढ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना मिळणार अनुभवाधारित शिक्षण

उद्योग आणि विद्यापीठ यांच्यातील दरी कमी करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण देणे, ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाने उचललेले हे मोठे पाऊल आहे. हा उच्च शिक्षणातील परिवर्तनाचा नवा अध्याय असून या धोरणात्मक भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे तर जागतिक स्पर्धेला तोंड देण्यास सक्षम कौशल्ये प्राप्त होऊ शकतील, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in