

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरातील ऐतिहासिक इमारतीचे नुकसान झाले असून हेरिटेज इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सोमवारी सकाळी विद्यापीठाच्या ऐतिहासिक इमारतीचा वरच्या भागातील एक दगड उच्च न्यायालयाच्या समोरील प्रवेशद्वाराजवळ असलेल्या फूटपाथवर कोसळला.
या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ खबरदारी म्हणून तो परिसर बॅरिकेड्स लावून बंद केला असून पादचाऱ्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या. फोर्ट कॅम्पसचे बँक ऑफ बडोदासमोरील मुख्य प्रवेशद्वार २ मे २०२६ पासून दुरुस्तीसाठी बंद असल्याने या घटनेला अधिक गांभीर्य आले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या समोरील गेटचा वापर विद्यार्थी, कर्मचारी आणि अभ्यागतांसाठी मुख्य प्रवेशमार्ग म्हणून केला जात होता. आता या प्रवेशद्वाराजवळही दगड कोसळल्याने कॅम्पसच्या दोन्ही मुख्य प्रवेशद्वारांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. सततचा मुसळधार पाऊस आणि इमारतीच्या बाहेरील भिंतीवर घासणाऱ्या मोठ्या झाडांच्या फांद्यांमुळे हा दगड निखळल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेनंतर युवा सेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली. फोर्ट कॅम्पसच्या इमारती संरक्षित हेरिटेज वास्तू असल्याने पुरातत्व विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय दुरुस्तीचे काम करता येत नाही, असे कुलसचिवांनी स्पष्ट केले. विद्यापीठ या परवानगीसाठी प्रयत्न करत असून झाडांच्या छाटणीसाठी पालिकेकडे परवानगी मागितली असल्याचे त्यांनी सांगितले.
हेरिटेज इमारतीच्या देखभालीचा मुद्दा चर्चेत
युवा सेनेने पुरातत्त्व विभाग आणि बीएमसीला दिलेल्या पत्रांची प्रत मागितली असून यामुळे परवानगी प्रक्रियेला गती देण्यास मदत - होईल असे म्हटले आहे. विद्यार्थी संघटनेने विद्यार्थी, पालक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन तातडीने उपाययोजना - करण्याची मागणी विद्यापीठ प्रशासनाकडे केली असून दिरंगाई झाल्यास मोठा अपघात होऊ शकतो असा इशारा दिला आहे. या घटनेमुळे विद्यापीठाच्या हेरिटेज इमारतींच्या देखभाल आणि संरचनेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून युवा सेनेसह अनेक विद्यार्थी संघटनांनी प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.