मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक CORS स्टेशन उभारणार; भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार, जाणून घ्या सविस्तर

हे स्टेशन मुंबईसह पश्चिम विभागासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. याचा लाभ शासकीय विभाग, खासगी सर्वेक्षक, अभियंते, संशोधक आणि विद्यार्थ्यांना होणार आहे. सीओआरएस स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर जीपीएस आधारित सर्वेक्षण, भू-मापन, मॅपिंग आणि स्थाननिर्धारण प्रक्रियेत अत्यंत उच्च अचूकता व विश्वासार्हता प्राप्त होणार आहे. शहरी नियोजन, स्मार्ट सिटी प्रकल्प, पायाभूत सुविधा विकास, बांधकाम क्षेत्र, वाहतूक...
मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक CORS स्टेशन उभारणार; भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार, जाणून घ्या सविस्तर
Published on

मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्यात नुकताच शैक्षणिक, संशोधन आणि तांत्रिक सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारण्यात येणार आहे. हे स्टेशन मुंबईसह पश्चिम विभागासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

लाभ कोणाला, फायदा काय?

सीओआरएस स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर जीपीएस आधारित सर्वेक्षण, भू-मापन, मॅपिंग आणि स्थाननिर्धारण प्रक्रियेत अत्यंत उच्च अचूकता व विश्वासार्हता प्राप्त होणार आहे. शहरी नियोजन, स्मार्ट सिटी प्रकल्प, पायाभूत सुविधा विकास, बांधकाम क्षेत्र, वाहतूक व्यवस्थापन तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी या सेवांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे. सीओआरएस स्टेशनमुळे सेंटीमीटर-स्तरावरील अचूक स्थानिक माहिती रिअल-टाइम स्वरूपात उपलब्ध होणार आहे. याचा लाभ शासकीय विभाग, खासगी सर्वेक्षक, अभियंते, संशोधक आणि विद्यार्थ्यांना होणार आहे. विशेषतः भूगोल, जिओ-इन्फॉर्मेटिक्स, जीआयएस, रिमोट सेन्सिंग, संगणकीय अनुकूलन तसेच एआय/एमएल आधारित भू-स्थानिक संशोधनासाठी मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि आधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळणार आहे.

वारसा डेटा, डिजिटल डेटा उपलब्ध होणार

मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागातील सर्व प्राध्यापकांच्या पुढाकारामुळे हा सामंजस्य करार झाला आहे. या कराराअंतर्गत विद्यापीठातील विद्यार्थी आणि संशोधकांना भारतीय सर्वेक्षण विभागाकडे असलेला वारसा डेटा, स्थानिक व डिजिटल डेटा, सीओआरएस नेटवर्क तसेच विविध भू-स्थानिक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रमासाठी संधी

विद्यार्थ्यांना व संशोधकांना संधी उपलब्ध करून देणे, हा या कराराचा महत्त्वाचा भाग आहे. यासोबतच शैक्षणिक व तांत्रिक सहाय्य देणे, अधिकाऱ्यांना पदव्युत्तर व पीएचडीसाठी संधी उपलब्ध आणि विद्यापीठातील संशोधन विद्यार्थ्यांना सर्व्हे ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षण देणे, यावरही भर देण्यात आला आहे.

भारत सरकारचा १७६७ साली स्थापन झालेला भारतीय सर्वेक्षण विभाग हा सर्वात जुना वैज्ञानिक विभाग असून, देशासाठी अधिकृत व मूलभूत भू-स्थानिक माहिती उपलब्ध करून देण्याचे महत्वपूर्ण कार्ये विभागाच्या माध्यमातून केले जाते.

logo
marathi.freepressjournal.in