
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या चमूला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकनृत्य सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. इटलीत होत असलेल्या ७७व्या लोकनृत्य महोत्सवासाठी मुंबई विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे. महोत्सवात निवडक २९ देशांची निवड करण्यात आली असून मुंबई विद्यापीठ भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. महोत्सवाला सुरुवात झाली असून मुंबई विद्यापीठाच्या चमूने लोकनृत्य सादर केले.
आंतरराष्ट्रीय महोत्सवात मुंबई विद्यापीठाची चमू ‘दिवळी’ हे लोकनृत्य सादर करणार आहे. दिवळी हे लोकनृत्य दिव्यांचे नृत्य म्हणून ओळखले जाते. दिवे पूर्णपणे संतुलित राहतील याची खात्री करून नर्तक मोजलेल्या पावलांनी हलतात. पारंपारिक गोव्याच्या लोकगीतांच्या तालांशी समक्रमीत केलेला उत्कृष्ट देखावा समजला जातो.
१५ मार्च २०२५ पऱ्यंत इटलीतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या एग्रीजेंटो महापालिका शहरात विविध ठिकाणी या लोकनृत्याचे सादरीकरण केले जाणार आहे. भारतीय विद्यापीठे संघाच्या (एआययू) निमंत्रणावरून मुंबई विद्यापीठाच्या चमूला इटली येथील सांस्कृतिक महोत्सवात सादरीकरणासाठी आमंत्रित केले आहे. या चमूमध्ये १० विद्यार्थी, संघ व्यवस्थापक, नृत्य दिग्दर्शक, सहाय्यक आणि सांस्कृतिक समन्वयक यांचा समावेश आहे.