मुंबई विद्यापीठाचा ९६८.१८ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; १४७ कोटी ६३ लाखांचा तुटीचा अर्थसंकल्प, शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी १० कोटी

मुंबई विद्यापीठाचा २०२५- २६ या वित्तीय वर्षाचा रुपये ९६८.१८ कोटींचा अर्थसंकल्प आजच्या सिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला.
मुंबई विद्यापीठाचा ९६८.१८ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; १४७ कोटी ६३ लाखांचा तुटीचा अर्थसंकल्प, शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी १० कोटी
Published on

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा २०२५- २६ या वित्तीय वर्षाचा रुपये ९६८.१८ कोटींचा अर्थसंकल्प आजच्या सिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये १४७ कोटी ६३ लाखांची तूट दाखविण्यात आली आहे. २०२५-२६ वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये संशोधन आणि नावीन्यपूर्ण संस्कृतीच्या बळकटीकरण, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण आणि वैश्विक नागरिकत्व शिक्षणासाठी पुढाकार, विद्यार्थी सहाय्य आणि प्रगती उपक्रम, माजी विद्यार्थी कनेक्ट आणि विद्यापीठ-औद्योगिक साहचर्य उपक्रम यासह शैक्षणिक आणि गव्हर्नन्स उत्कृष्टता उपक्रमांसाठी ७५ कोटींची भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये विविध नावीण्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. वित्तीय वर्ष २०२५-२६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, प्रा. बाळ आपटे दालन आणि सभागृह, स्कूल ऑफ लँग्वेजेस इमारत दुसरा टप्पा, अवेस्ता पहलवी अभ्यास केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह दुसरा टप्पा, मुलींचे वसतिगृह, वेंगुर्ले येथील सागरी अध्ययन केंद्र आणि तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवासी संकुल व सामुदायिक सभागृह अशा अनुषंगिक विकासकामांना प्राधान्य देत १३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्गवारीतील सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, विद्यापीठ विभाग रँकिंग, शैक्षणिक ऑडिट पोर्टल आणि रँकिंग फ्रेमवर्क, प्रतिष्ठित प्राध्यापकांची व्याख्याने, कुलगुरू योजना, ई-सामग्री विकास आणि महा-स्वयमसाठी शिक्षकांचे प्रशिक्षण, राज्य आणि राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ/संस्थात्मक सहयोग आणि संबंध (विद्यार्थी/शिक्षक विनिमय, संयुक्त संशोधन कार्यक्रम, ट्विनिंग/जॉइंट/ड्युअल डिग्री प्रोग्राम), स्कूल    कनेक्ट आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी (प्रशिक्षण, जागरूकता कार्यशाळा, डिजिटलायझेशन इ.), बीकेएस (भारतीय ज्ञान प्रणाली) सेल, अध्यापन-शिक्षण-मूल्यांकनामध्ये एआय सहाय्य/ सक्षम/ निर्देशित प्रणाली आणि तंत्रज्ञानाचा वापर अशा शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी रुपये १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

संशोधन आणि नावीन्यपूर्ण संस्कृतीच्या बळकटीकरणावर भर देत संशोधन विकास कक्ष, केंद्रीय संशोधन, उपकरणे आणि डिजिटलायझेशन सुविधा, सर्वोत्कृष्ट संशोधक आणि नवोपक्रम पुरस्कार, संशोधक आणि नवकल्पनांसाठी प्रोत्साहन, अविष्कार विजेत्यांना प्रोत्साहन आणि स्टार्टअप उपक्रमांना सहाय्य, नोबेल विजेत्यांची व्याख्यानमाला, बौद्धिक संपदा अधिकारांना प्रोत्साहन, ग्लोबल इनिशिएटिव्ह, मोबाइल टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन प्रात्यक्षिक व्हॅन, क्रिटिकल आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजीज (प्रगत संगणन आणि सेमीकंडक्टर्स, प्रगत साहित्य आणि नॅनोटेक्नॉलॉजी, क्वांटम माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान, अनुवांशिक अभियांत्रिकी, सायबर सुरक्षा, महासागर संशोधन, शाश्वत शेती, विषाणूशास्त्र, हवामान अनुकूलता विकास, आणि कार्यक्षमता संशोधनाला प्रोत्साहन, आरोग्यसेवा, स्मार्ट शहरे, स्मार्ट गतिशीलता आणि वाहतूक विषयांवरील संशोधनाला चालना देण्यासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या उद्देश्याने उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण आणि वैश्विक नागरिकत्व शिक्षणासाठी पुढाकार घेत विद्यापीठाने या वित्तीय वर्षात रुपये ५ कोटींची तरतदू केली आहे. अशा प्रमुख ठळक वैशिष्ट्यांवर आधारीत वित्तीय वर्ष २०२५-२६ चा रुपये ९६८.१८ कोटींचा अर्थसंकल्प सीए. हर्षल वाघ, वित्त व लेखा अधिकारी यांनी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राचार्य. डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, यांच्या उपस्थितीत अधिसभेच्या मान्यवर सदस्यांसमोर सादर केला.

वार्षिक लेखा अहवाल आणि वार्षिक अहवाल अधिसभेत मंजूर सादर

मे. किशोर अँड कंपनी (सी.ए.) यांनी सादर केलेले मुंबई विद्यापीठाचे सन २०२२-२३ चे वार्षिक लेखे, ३१ मार्च २०२३ चा ताळेबंद व लेखापरीक्षण अहवाल शनिवारी पार पडलेल्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. तसेच शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ चा मुंबई विद्यापीठाचा वार्षिक अहवाल अधिसभेत मंजूर करण्यात आला.

विद्यार्थी उपक्रमांसाठी ५ कोटींची तरतूद   

त्याचबरोबर विद्यार्थी सहाय्य आणि प्रगती उपक्रमांसाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली असून यामध्ये सिंगल विंडो सिस्टीम आणि स्टुडंट हेल्पडेस्क, लर्नर सपोर्ट सिस्टीम, समान संधी सेल, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी सुविधा, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू सेल, सुवर्ण पदके आणि मेरिट अवॉर्ड्स/स्कॉलरशिप मध्ये वाढ अशा योजनांचा समावेश आहे. माजी विद्यार्थी कनेक्ट आणि विद्यापीठ-औद्योगिक साहचर्य उपक्रमासाठी रुपये ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

२०२५-२०२६ नावीन्यपूर्ण योजना/उपक्रम

lगुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि उत्कृष्टता शैक्षणिक उपक्रम १० कोटी

संशोधन व नावीन्यपूर्ण संस्कृतीच्या बळकटीकरणासाठी पुढाकार १५ कोटी

विद्यार्थी सहाय्य आणि प्रगती उपक्रम ५ कोटी

माजी विद्यार्थी कनेक्ट आणि विद्यापीठ- औद्योगिक साहचर्य उपक्रम ५ कोटी

उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण आणि वैश्विक नागरिकत्व शिक्षणासाठी पुढाकार ५ कोटी

गुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि उत्कृष्टता गव्हर्नन्स उपक्रम ३५ कोटी

२०२५-२६ या वर्षामधील नियोजित बांधकामे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र- रुपये १५ कोटी

तृतीय व चतूर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवासी संकूल व सामुदायिक सभागृह- रुपये ५० लाख

प्रा. बाळ आपटे दालन – रुपये २५.९१ कोटी

स्कूल ऑफ लॅंग्वेजेस इमारत (२ रा टप्पा), अवेस्ता पहलवी अभ्यास केंद्र - रुपये १४ कोटी

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (२ रा टप्पा)- रुपये ५० लाख

मुलींचे वसतिगृह ८ कोटी ५ लाख

वेंगुर्ला उपपरिसराचा विकास-    रुपये १.०० कोटी

logo
marathi.freepressjournal.in