‘इंद्रधनुष्य’वर मुंबई विद्यापीठाची विजयी पताका; २० वर्षांच्या कारकीर्दीमध्ये तब्बल १९ वेळा विजयाचा बहुमान

२० व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये मुंबई विद्यापीठाने बाजी मारत अव्वल स्थान पटकावले आहे. ७ ते ११ नोव्हेंबर दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या या युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने विजयी मोहर उमटवली.
‘इंद्रधनुष्य’वर मुंबई विद्यापीठाची विजयी पताका; २० वर्षांच्या कारकीर्दीमध्ये तब्बल १९ वेळा विजयाचा बहुमान
Published on

मुंबई : २० व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये मुंबई विद्यापीठाने बाजी मारत अव्वल स्थान पटकावले आहे. ७ ते ११ नोव्हेंबर दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या या युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने विजयी मोहर उमटवली. विशेष म्हणजे आतापर्यंत मुंबई विद्यापीठाने स्पर्धेच्या २० वर्षाच्या कारकीर्दीमध्ये तब्बल १९ वेळा हा अंतिम सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक आपल्याकडे राखण्याचा बहुमान मिळविला आहे.

संगीत, साहित्य, आणि ललित कला या गटांतील स्पर्धांमध्ये विजयी सलामी देत सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने ९१ गुणांची कमाई करत सर्वसाधारण विजेतेपद मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. द्वितीय क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यापीठास ७० गुण मिळाले आहेत. राज भवनद्वारे आयोजित या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये राज्यातील २३ विद्यापीठे सहभागी झाली होती.

विद्यापीठाच्या ५५ विद्यार्थ्यांच्या संघानी या सर्व कलाप्रकारात सहभाग घेतला होता.पाश्चिमात्य वाद्य, भारतीय शास्रीय नृत्य, प्रहसन, प्रश्नमंजुषा, आणि व्यंगचित्र या स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळाले आहे. तर लोकवाद्यवृंद, भारतीय शास्रीय तालवाद्य, भारतीय शास्रीय गायन, नाट्य संगीत, मुकनाट्य, वादविवाद आणि शोभायात्रा या स्पर्धांमध्ये कांस्य पदक प्राप्त झाले आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य. डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी विजयी चमूचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यापीठाचे निर्विवाद वर्चस्व

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय समूह गायन, पाश्चिमात्य समूह गायन, वक्तृत्व आणि छायाचित्रण या स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. कुमारी शिवया शर्मा आणि सुधांशू सोमण या विद्यार्थ्यांनी विविध सहा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन सर्वात जास्त बक्षिस मिळवून गोल्डन गर्ल आणि गोल्डन बॉयचा किताब मिळवला.

logo
marathi.freepressjournal.in