

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात लवकरच गुजरातच्या सिंहांची गर्जना कानी पडणार आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र लिहून सिंह देण्याची मागणी करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दक्षिण मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय हे लाखो पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. पालिकेच्या या उद्यान व प्राणिसंग्रहालयात १५ पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. याशिवाय २५६ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत. त्यामुळे बच्चेकंपनीसह मोठ्यांनाही राणी बाग नेहमीच खुणावत आली आहे. परंतु आता राणी बागेतील प्राणिसंग्रहालयात गुजरातच्या सिंहांची डरकाळी कानी पडणार आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे लवकरच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र लिहून राणीच्या बागेसाठी सिंहांची मागणी करणार आहेत. गुजरात राज्यात आशियाई सिंहांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे एक किंवा दोन सिंह मुंबईला देण्याची विनंती या पत्रातून केली जाणार आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीच्या बागेत सिंहांसाठी आवश्यक जागा आणि सुविधा उपलब्ध असल्याचे प्राणिसंग्रहालयाकडून सांगण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून राणीच्या बागेत मोठा नवीन प्राणी दाखल झालेला नाही.
झेब्रा, जिराफ आणण्याचा प्रस्ताव
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात लवकरच काही नवीन प्राणी आणि पक्ष्यांची येण्याची शक्यता वाढली आहे. प्राणिसंग्रहालयाने विविध देशांतर्गत तसेच परदेशी प्राणिसंग्रहालयांशी प्राणी अदलाबदल (एक्स्चेंज) करण्याबाबत प्रस्ताव पाठवले असून त्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मान्यता अपेक्षित आहे. सिंहांच्या नव्या जोडगोळीबरोबरच झेब्रा आणि जिराफ यांसारख्या प्राण्यांना आणण्याचा प्रस्ताव आहे. तसेच पर्यटकांचे आकर्षण वाढवण्यासाठी काही दुर्मीळ विदेशी पक्षी, विशेषतः रंगीबेरंगी मॅकॉ पोपट आणि इतर उष्णकटिबंधीय प्रजातींचाही समावेश करण्याची तयारी सुरू आहे.