मुंबई : पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेसावे ते भाईंदर दरम्यान सागरी किनारा उन्नत मार्ग साकारला जात आहे. हा प्रकल्प पूर्ण होऊन प्रत्येक सेवेत दाखल झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील प्रवास अधिक वेगवान होणार आहे. त्यामुळे वेसावे ते भाईंदर उन्नत मार्गाला गती द्या, असे निर्देश मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. तसेच ज्या ठिकाणी खोदकाम सुरु आहे त्याठिकाणी 'वॉटर स्प्रिंकलर मशीन' उपलब्ध करा, असे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.
मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्पाच्या कामांचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन आढावा घेतला. प्रकल्पाचे काम सुरू असताना प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक बाबींची अंमलबजावणी गांभीर्याने केली जाईल याची दक्षता घ्यावी. खोदकाम केल्यानंतरचा निघालेला राडारोडा साठवणूक तसेच वाहतूक करताना तो झाकला जाईल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
गोराईत ॲक्सेस ब्रिजची पाहणी
मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत सात पॅकेज आहेत. सातही पॅकेजमध्ये कामे गतीने सुरू असून, डिसेंबर २०२८ पर्यंत कामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने काम करण्यात येत आहे. पॅकेज 'इ' अंतर्गत अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांसमवेत गोराई जेट्टीची तसेच गोराई जेट्टीच्या ठिकाणी सुरू असलेल्या टेम्पररी अॅक्सेस ब्रिजची पाहणी केली. सेक्टर ८ चारकोप पासून ते बोरिवलीपर्यंत संपूर्ण अलाइनमेंटची चार तुकड्यांमध्ये विभागणी करून, प्रत्येक टप्प्याचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री पुरविण्यात आली आहे आणि त्याचे काम सुरू आहे. या पॅकेजमध्ये गोराई जेट्टीच्या ठिकाणी एक केबल स्टेड ब्रिजही उभारला जाणार आहे. हे काम वेळखाऊ असल्यामुळे, या कामाच्या अंमलबजावणीसाठी विलंब होणार नाही याची अधिक दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
मालाड आंतरबदलाची संपूर्ण पाहणी
प्रकल्पाच्या पॅकेज ‘बी’ अंतर्गत माईंडस्पेस मालाड आंतरबदलाची बांगर यांनी संपूर्ण पाहणी केली. याठिकाणी जवळपास चार हजार मीटर लांबीचा तात्पुरता प्रवेश पूल बांधला जाणार आहे. येथे सात दिशेने समांतर पध्दतीने टॅबचे पायलिंग केले जाईल हे सुनिश्चित करावे. तसेच हा टॅब बांधणीचा दर कुठल्याही परिस्थितीत दोन मीटर प्रति दिवसापेक्षा खाली येणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या.
दररोज १३५० क्युबिक मीटर गतीने खोदकाम
पॅकेज सी येथे रहेजा यांच्या जमिनीच्या ठिकाणी रिट्रीवल शाफ्ट तयार केला जाणार आहे. तसेच या जागेच्या पायलिंगचे काम त्वरित सुरू करावे, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. त्याचप्रमाणे चारकोप येथे लॉन्चिंग शाफ्टची पाहणी केली. लॉन्चिंग शाफ्ट मध्ये सध्या खोदकाम सुरू आहे. जवळपास दहा मीटर पर्यंत खोदकाम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी दररोज १३५० क्युबिक मीटर या गतीने सध्या खोदकाम सुरू आहे.
दुसऱ्या बोगद्याच्या कामाला ३१ जुलैपासून शुभारंभ
या शाफ्टचे काम ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करून १ एप्रिल २०२७ पासून टनेल बोरिंग मशीनची जोडणी आणि ३१ मे २०२७ रोजी टनेल बोरिंग मशीनने पहिल्या बोगद्याच्या प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात, असे नियोजन आहे. त्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजे ३१ जुलै २०२७ रोजी दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामाला सुरुवात केली जाणार आहे. पहिले टनेल मशीन मालाड येथील रिट्रीवल शाफ्ट येथे जुलै २०२७ पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. तोपर्यंत मालाड चा रिट्रीवल शाफ्ट पूर्ण होईल, असे नियोजन करून काम करावे असे निर्देश बांगर यांनी दिले.