जुलै महिन्यात धो-धो पाऊस! कमी वेळेत अधिक बरसणार; मुंबईकरांनो काळजी घ्या - कुलाबा हवामान विभागाचे आवाहन

जागतिक तापमान वाढीमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत. वातावरणीय बदलांमुळे पाऊसही लहरी झाला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : जागतिक तापमान वाढीमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत. वातावरणीय बदलांमुळे पाऊसही लहरी झाला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे मुंबईत जादा पाऊस बरसत असल्याने मुंबईतील अनेक भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. यंदाही जुलै महिन्यात जादा पाऊस बरसणार असून, कमी दिवसांत जादा पाऊस बरसणार, असा अंदाज असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी सांगितले.

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग आणि असर सोशल इम्पॅक्ट ॲॅडव्हायर्जसच्या वतीने चर्चगेट येथील आयएमसीमध्ये मुंबई महानगरातला बदलता मान्सून या विषयावर वार्तालाप आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

वातावरणीय बदलांचा फटका मान्सूनला बसत आहे. जुलै महिन्यात सरासरी ९०० मिलीमीटर पाऊस होतो. यावर्षी कदाचित यापेक्षा जास्त पाऊस होईल. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाला अशा पावसाची माहिती देण्यासाठी हवामान खात्याने सर्व यंत्रणांशी समन्वय साधला आहे.

आणखी चार ठिकाणी रडार बसवणार

मुंबईत २ डॉप्लर रडार असून, त्याद्वारे १० मिनिटांनी हवामानाची माहिती मिळवली जात आहे. दिशा समजण्यासाठी कोणते ढग, किती पाऊस देणार आहेत. ३ तासांत कुठे आणि किती पावसाची शक्यता आहे? याची माहिती मिळण्यास याची मदत होत आहे. मुंबईत आणखी ४ ठिकाणी रडार लागणार असून, आयआयटीएमद्वारे याचे काम केले जात आहे. यामुळे अंदाज वर्तविण्यासाठी आणखी मदत होईल.

'सकाळी उकाडा, रात्री गारवा'

रविवारी रात्री ९ नंतर पावसाने मुंबईला पाच तास झोडपले. पहिल्याच पावसात मुंबईत पडझडीच्या घटना घडल्या. रविवारी रात्री बरसणाऱ्या पावसाने सोमवारी सकाळी विश्रांती घेतली, परंतु सोमवारी रात्री ही मुंबईतील अनेक भागात जोरदार हजेरी लावली. मात्र मंगळवारी मुंबईत ढगाळ वातावरण होते आणि मंगळवारी सकाळी पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना उन्हाचा चटका सहन करावा लागला. त्यामुळे सोमवार व मंगळवारी सकाळी उकाडा अन् रात्री हवेत गारवा होता.

मान्सूनने मुंबईत दाखल होत दमदार हजेरी लावत रविवारी व सोमवारी जोरदार कोसळला. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. मंगळवारी मात्र काहीशी पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईत पुन्हा उकाडा जाणवला. त्यामुळे चांगल्या पावसाची मुंबईकरांना प्रतीक्षा आहे.

मुंबईत यंदा दोन दिवस आधीच मान्सून दाखल झाला. रविवारी पहिल्याच दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. सोमवारीही पाऊस कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. या दोन्ही दिवशी ढगाळ वातावपरण होते. मात्र मंगळवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुन्हा उकाडा वाढला. दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबई व उपनगरांत पावसाच्या मध्यम व हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in