
मुंबई : मुंबई आणि राज्यात दहीहंडीच्या उत्सवाची तयारी सुरू असतानाच विक्रोळीतील पार्कसाईट येथील वर्षानगर विभागातील मिश्रा कुटुंबावर दरडीचे थर कोसळले. विक्रोळी उपनगरात शनिवारी मध्यरात्री दरड कोसळून बापलेकीचा मृत्यू झाला. सुरेश मिश्रा (५०) आणि शालू मिश्रा (१९) अशी बापलेकीची नावे असून आई, मुलगा आणि शेजारी चौघे जण गंभीर जखमी राहणारे अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवार रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असतानाच, विक्रोळी पार्कसाईट येथील वर्षा नगर विभागातील जनकल्याण सोसायटीमधील मिश्रा कुटुंबाच्या घरावर शनिवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अचानक डोंगराचा मोठा भाग कोसळला. गाढ झोपेत असतानाच तसेच आजूबाजूला सर्वत्र अंधार असतानाच, ही घटना घडल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. घटनेदरम्यान आवाजामुळे परिसरात एकच झालेल्याखळबळ माजली. शेजाऱ्यांनी तत्काळ दुर्घटनेची माहिती महापालिका आणि अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे जवान आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले.
दरम्यान, पावसाबरोबर डोंगरावरून मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा घरावर कोसळला. त्यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली मिश्रा कुटुंबिय अडकले होते. काही वेळाने ढिगाऱ्याखालून सुरेशचंद्र मिश्रा, आरती मिश्रा, ऋतुराज मिश्रा आणि शालू मिश्रा या चौघांना बाहेर काढण्यात आले. तसेच या दुर्घटनेत शेजारचे दोघे जणही जखमी झाले. त्यानंतर त्यांना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच सुरेशचंद्र मिश्रा आणि शालू मिश्रा या बापलेकीचा मृत्यू झाला. तर आरती मिश्रा (४५) आणि ऋतुराज (२०) यांच्यासह अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या घटनास्थळी राडारोडा हटविण्याचे काम सुरू आहे. तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून आजूबाजूची घरे रिकामी करण्यात आली आहेत.
विक्रोळीतील पार्कसाईट हा डोंगराळ परिसर असून या डोंगरावर मोठी झोपडपट्टी वसलेली आहे. अनेक भागांमध्ये संरक्षक भिंत बांधूनही प्रत्येक पावसाळ्यात याठिकाणी दरडी कोसळण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे पालिका यंत्रणेसह अन्य यंत्रणा दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन करतात. परंतु, येथील नागरिक पालिकेच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष करतात, अशी प्रतिक्रिया पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.
आम्हाला आधी सूचनाच दिली नाही- रहिवासी
नागरी अधिकाऱ्यांनी यावर्षी परिसर रिकामा करण्याची कोणतीही पूर्वसूचना पाठवली नव्हती. हा परिसर पावसाळ्यात अशा अपघातांसाठी धोकादायक आहे. आम्ही आमच्या घरात झोपलो होतो, तेव्हा अचानक पहाटे अडीचच्या सुमारास एका घरावर ढिगारा कोसळला आणि एक कुटुंब अडकले. सर्व जण धावू लागले, पण स्थानिक अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ढिगाऱ्यात अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढले. या परिसरात असे काहीतरी घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यासाठी कोणीही जबाबदार नाही. हे मुसळधार पावसामुळे घडले, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.